ताज्या बातम्या

माथाडी कायदा अधिक मजबूत करणार; ३ हजार कामगारांना हक्काची घरे देणार – मुख्यमंत्री फडणवीस

वाशी : माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात आणला जाणार नाही. उलट हा कायदा अधिक प्रभावी व मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर शासन गांभीर्याने काम करीत असून, वडाळा येथील गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून सुमारे २ हजार ८५० ते ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यातही माथाडी कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माथाडी कामगारांच्या गृहनिर्माणाशी संबंधित जमीन व नियोजनाबाबत शासनाच्या विविध नोंदी उपलब्ध आहेत.

राज्यातील सर्व ३६ माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्यात येणार असून, मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र पॅनेलमार्फत लेखापरीक्षण केले जाणार आहे. कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे तसेच अपघात नुकसानभरपाईचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील माथाडी मंडळे १९६९ पासून असंघटित हातमजूर कामगारांच्या कल्याण व सामाजिक सुरक्षेसाठी कार्यरत आहेत.

माथाडी कामगारांच्या नावाचा गैरवापर करून कामगारांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. तसेच ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांबाबतच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वाशी एपीएमसी मार्केटचा अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करून माथाडी कामगारांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या मुलांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या स्वतंत्र योजना राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीवर भर देण्याचे आवाहन केले. पुढील पिढीने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत प्रगती करावी, असे सांगताना माथाडी रुग्णालयाचे आधुनिकीकरण तसेच वडाळा गृहप्रकल्पाचे काम विनाविलंब पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पणन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी बाजार व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. वाशी एपीएमसी मार्केटचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येणार असून, वजनाच्या

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, डॉ. प्राची पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, माथाडी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत माथाडी कामगारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Scroll to Top