ताज्या बातम्या

तापोळा-अहिर केबल स्टेड ब्रिजच्या आठवणींना दिला उजाळा….

तापोळा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील अति दुर्गम व मागास पण, नैसर्गिक वरदान लाभलेल्या जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील विकास कामांना गती आली आहे. राज्याचे शिवसेना पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री तथा महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रगतीचे खरे शिल्पकार ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या वाहनातून या ठिकाणी येऊन स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण झाले आहे. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया श्री जाधव यांनी या पुलावरून मार्गक्रमण करताना दिली आहे. तापोळा तालुका महाबळेश्वर येथील ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या तापोळा-अहिर केबल-स्टेड ब्रिज म्हणजे एकनाथ सेतू म्हणून यापुढे ओळखला जाणार आहे. रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी राम सेतूची उभारणी केली. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने दरेतांब भूमिपुत्र असलेल्या भक्तांनीही पर्यटन वाढीसाठी व आपल्या भूमिपुत्रांसाठी सेतू उभा करून स्वप्न पूर्ण केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालपणी तापोळा, कांदाटी, सोळशी परिसरातील दळणवळणाची साधने नसल्यामुळे होणाऱ्या वेदना सहन केल्या. त्या वेदनेतूनच उभारलेल्या या विकास कामांना आता खऱ्या अर्थाने एकनाथ सेतू लाभला आहे. येथील पर्यटन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आता आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मानवी जिद्द व प्रेरणा आणि पारदर्शकता यामुळेच महत्त्वाकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट उभा राहिला आहे. ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा परिसरातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे निसर्गरम्य वर्णन आता चक्क तापोळा- अहिर पुलावरून सुद्धा पर्यटकांना मनमुराद पाहता येऊ लागले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सुमारे १८५ कोटी रुपये खर्च झाले आहे. ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असलेल्या पुलामुळे नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबल ब्रिज: मुंबईच्या ‘सी लिंक’ धर्तीवर तापोळा- अहिर- केबल ब्रिज व पर्यटकांसाठी ४३ मीटर उंचीवर गॅलरी व कॅप्सूल लिफ्ट सुविधा निर्माण केली आहे. या पुलामुळे पश्चिम घाट व कोकण थेट जोडले गेले आहेत. या दोन भागांमधील अंतर ५० किलोमीटर इतके कमी झाल्यामुळे इंधन व वेळेची बचत होत आहे. दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली होती. आता तीन वर्षांनी ड्रीम प्रोजेक्ट उभा राहिल्याने श्री. जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहे. स्वतः या पुलावरून प्रवास करून या कामाचे कौतुक केले आहे. महाबळेश्वर-तापोळा विकास आराखड्यांतर्ग भविष्यात तापोळा आणि उरमोडी येथे सी-प्लेन प्रकल्प, सायकल ट्रॅक, रोपवे आणि फर्निक्युलर रेल्वे यांसारख्या आधुनिक सुविधा आणण्याचे स्वप्नसुद्धा पूर्ण होईल असा विश्वास शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. लवकरच याचे धुमधडाक्यात उद्घाघाटन करून तापोळा- अहिर पूल पर्यटकांच्या साठी खुला झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या भागाचा पर्यटन वाढीचा श्री गणेशा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे सामान्य जावळी- महाबळेश्वर भूमिपुत्र व पर्यटकांना न्याय मिळाला आहे. अशी भावना सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, गणेश उत्तेकर, उद्योजक विठ्ठल धनावडे व कार्यकर्ते सुभाष कारंडे यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

फोटो- तापोळा- अहिर ड्रीम प्रोजेक्ट भूमिपूजन व काम पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करताना पुरुषोत्तम जाधव (छाया- अजित जगताप, तापोळा)

Scroll to Top