वडूज(अजित जगताप) : हुतात्म्याची नगरी असा वारंवार उल्लेख केलेल्या खटाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत धंदेवाल्यांचे जाळे विणले गेले आहे. त्या विरोधात आता वडूजमध्ये गुरुवार दिनांक १ ऑक्टोबरला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोपट जाधव यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
माण – खटाव विधानसभा मतदार संघामध्ये अनधिकृत धंदेवाल्यांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. अनधिकृत धंद्यांच्या विळख्यात वाड्या वस्ती गावे सापडली आहेत. जनतेचे रक्षण करण्यापेक्षा पोलिसांनी धंदेवाल्यांचे किती दिवस कौतुक करत बसायचे? हाच ज्वलंत प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. त्यांचा आवाज म्हणून कान्हरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोपट जाधव यांनी वडूज उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय आणि अनाधिकृत धंदेवाल्यांच्या विरोधात थेट उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अन्यायग्रस्त जनतेने सामील व्हावे असे नम्र विनंती करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडूज, म्हसवड, औंध आणि दहिवडी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनधिकृत दारू, मटका, चक्री, जुगार, गुटखा, अमली पदार्थ आणि बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. हप्ते खोरी वाढली असल्याने कारवाई होत नाही. हे सर्व ३० सप्टेंबरपर्यंत थांबला नाही, तर गुरुवार १ ऑक्टोबर रोजी वडूज पोलीस ठाण्याबाहेर हप्तेखोर खाकी वर्दीला आणि अनधिकृत धंदेवाल्यांना आरसा दाखवण्यासाठी आमरण उपोषण सुरू होणार आहे. माण – खटाव विधानसभा मतदारसंघात जेव्हा एखादा जागरूक नागरिकांनी अनधिकृत धंद्यांची माहिती कर्तव्यदक्ष पोलिसांना देतो, तेव्हा पोलीस ती माहिती गोपनीय ठेवण्याऐवी थेट धंदेवाल्यांच्या हप्त्याला जागून त्याला संपूर्ण माहिती पुरवतात. माहिती देणाऱ्याच्या वर जीवघेणे हल्ले घडवून आणले जात आहेत. इतकेच नव्हे तर, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या काही निर्भीड पत्रकारांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे. एखाद्या धंद्यावर कारवाई करताना अमुक पत्रकाराने तक्रार केली म्हणून आलो, असे खोटे सांगून पोलीस अनधिकृत धंदेवाल्याच्या मिठाला जागतात. अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना धंदेवाल्यांच्या निशाण्यावर आणून ठेवतात. कायदा रक्षकांनीच धंदेवाल्यांशी हातमिळवणी करून सामान्य जनतेचा आणि पत्रकारांचा विश्वासघात करावा, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? असाही प्रश्न प्रशांत जाधव यांनी उपस्थित केला आहे. आपल्या गावांचे कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी, गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी आणि या भ्रष्ट व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्यासाठी या लढ्याला जनआंदोलनाचे रूप देणे गरजेचे आहे. त्यासाठी तमाम जनतेने, सामाजिक संघटनांनी आणि स्वाभिमानी नागरिकांनी १ ऑक्टोबर रोजी वडूज पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जाहीररीत्या पोलिसांना मिळणाऱ्या मंथली हप्त्याची माहिती सुद्धा प्रसारित करण्यात येईल. त्याचे वाटेकरी कोण कोण आहे? हे ही स्पष्ट होईल. हुतात्म्याच्या नगरीमध्ये भावी पिढीसाठी आवाज उठवणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजावे. आता नाही तर कधीच हे अनधिकृत धंदे बंद होणार नाही. याची जाणीव ठेवून क्रांतीसाठी लोकांनी सोबत यावे असे कळकळीचे आवाहन केले आहे.
————————
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत एका पोलिसाला नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेलाच अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या वाहनासोबत फरफटत नेहले, त्या पोलिसांवर झालेल्या अन्यायाबाबत गुन्हा दाखल करायला दोन दिवस लागले. उलट त्या पोलिसाला वरिष्ठांनी दमदाटी केल्याचे कळते. जर ही अवस्था कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांची असेल तर सामान्य माणसाला न्याय मिळेल का ?ही अपेक्षा न ठेवलेली बरी असेही सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.




