ताज्या बातम्या

जावळी-महाबळेश्वरच्या दोन सुपुत्रांना ‘शरद रत्न’! शशिकांत शिंदे, संजूबाबा गायकवाड यांचा होणार गौरव

मुंबई : जावळी-महाबळेश्वरच्या मातीतून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन सुपुत्रांचा ‘शरद रत्न’ पुरस्काराने गौरव होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजय (संजूबाबा) गायकवाड यांची यंदाच्या ‘शरद रत्न पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे.
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘शरद रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शशिकांत शिंदे आणि संजूबाबा गायकवाड हे दोघेही जावळी-महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असल्याने त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विशेष योगायोग म्हणजे, जावळी-महाबळेश्वरच्या भूमीतून आलेल्या या दोन्ही मान्यवरांची ‘शरद रत्न’ पुरस्कारासाठी निवड जाहीर करणारे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘कोयना रत्न’ राजाराम बुवा शेलार हे देखील याच तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या पुरस्काराच्या निमित्ताने जावळी-महाबळेश्वरच्या भूमीशी संबंधित तीन मान्यवरांचे नाव एकाच व्यासपीठावर अधोरेखित होत आहे.
समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करणारा हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
‘कोयना रत्न’ राजाराम बुवा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Scroll to Top