अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव वाघा या मातीत सन १९६० मध्ये एका अशा कलापर्वाचा जन्म झाला, ज्याने पुढे महाराष्ट्राच्या लावणीविश्वाला आपल्या अदाकारीचे स्वतंत्र आकाश दिले. घुंगरांच्या निनादात जणू लयीचा श्वास घेणाऱ्या, नऊवारीच्या पदरातून लावणीच्या परंपरेचा डौल जपणाऱ्या आणि डोळ्यांच्या एका कटाक्षातूनही भावनांची अख्खी दुनिया उभी करणाऱ्या शकुंतला नगरकर आज देहाने आपल्यात नाहीत; मात्र त्यांच्या पावलांनी रंगमंचावर उमटवलेला लावणीचा ठेका अजूनही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीत घुमत आहे*.
घरच्या अंगणातूनच नृत्याची लय आणि सुरेल संगीताचे बाळकडू मिळालेल्या शकुंतला नगरकरांचा जीवनप्रवास हा संघर्षाचा, आव्हानांचा आणि लोककलेशी असलेल्या निष्ठेचा होता. प्रसिद्धीच्या झगमगाटाने त्यांना कधी भुरळ घातली नाही आणि पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी आपल्या कलेचा पारंपरिक बाज कधी सोडला नाही. लावणीच्या मातीशी, तिच्या शब्दांशी, तिच्या ठेक्याशी आणि तिच्या अदाकारीशी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत इमान राखले. त्यामुळेच त्यांच्या कलेची आठवण आज केवळ एका लावणी कलावंताची आठवण म्हणून राहत नाही; ती महाराष्ट्राच्या लोकपरंपरेच्या एका समृद्ध पर्वाची आठवण बनून मनात दरवळत राहते.
त्यांच्या पैंजणांचा नाद आज प्रत्यक्ष ऐकू येत नाही, नऊवारीचा तो डौल रंगमंचावर पुन्हा दिसत नाही आणि डोळ्यांतून शब्दांपेक्षा अधिक बोलणारी ती अदाकारी पुन्हा अनुभवता येत नाही. तरीही त्यांच्या कलेचे आयुष्य संपलेले नाही. कारण खऱ्या कलाकाराचा अंत त्याच्या देहाच्या थांबण्याने होत नसतो; त्याने जगवलेली कला त्याच्या जाण्यानंतरही काळाच्या पलीकडे प्रवास करत राहते. म्हणूनच ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीचा प्रत्यय शकुंतला नगरकरांच्या कलाप्रवासाकडे पाहताना येतो. त्यांनी जपलेली लावणी, तिचा पारंपरिक बाज आणि तिच्या सादरीकरणातील नजाकत ही त्यांच्या कर्तृत्वाची अजरामर साक्ष ठरत राहणार आहे.
त्यांच्या कलेची मोहिनी किती प्रभावी होती, याची प्रचिती देणारा एक प्रसंग आजही आठवला की लावणीच्या सामर्थ्याची जाणीव होते. हा प्रसंग केवळ एका कलाकाराच्या अदाकारीचा नाही; तर एका मोठ्या कलारसिकाच्या मनाला लोककलेने घातलेल्या मोहिनीचा आहे.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते १२ ऑगस्ट २००४ रोजी झाली. लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अथक प्रयत्नांतून उभी राहिलेली ही अकादमी महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आणि लोककलेच्या अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. लोककलेचे जतन, संवर्धन, प्रशिक्षण आणि संशोधन यांना संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दृष्टीने तिचे योगदान महत्त्वाचे राहिले. याच अकादमीत शकुंतला नगरकर यांची विद्यार्थ्यांना पारंपरिक लावणी आणि नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मानद प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दि. ३ मे २००७ हा दिवसही या अकादमीच्या इतिहासातील विशेष दिवस होता. लोकशाहीर अमरशेख यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार होते. लोककलेचे संशोधन, जतन आणि संवर्धन या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अध्यासनाच्या उद्घाटन सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार उल्हास पवार, लोकशाहीर कृष्णाजी साबळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू खोले यांच्यासह कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वातावरणात नेहमीचा औपचारिकपणा होता. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर मंत्रालयातील तातडीच्या बैठका होत्या. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून लगेच मंत्रालयात जायचे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. उद्घाटन सोहळा संपला. मान्यवर व्यासपीठावरून खाली उतरले आणि पहिल्या रांगेत येऊन बसले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि त्या क्षणी रंगमंचावर शकुंतला नगरकर आल्या.
नऊवारी साडीचा डौल, पैंजणांची लय, चेहऱ्यावरच्या भावछटा आणि डोळ्यांतून थेट रसिकाच्या मनाशी संवाद साधणारी ती खास लावणीची अदाकारी—शकुंतलाबाई रंगमंचावर आल्या आणि सभागृहातील वातावरणच बदलून गेले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि काही क्षणांतच रंगमंच व रसिक यांच्यातील अंतर नाहीसे झाले.
त्यांनी बैठकीची लावणी सुरू केली—
“नेसला पितांबर जरी,
जरी ग जरतार लाल साडी,
चालताना पदर झाली दुलसडी,
गळा पंचलडी,
चोळीवर खडी चमके आईना,
कुण्या सावकाराची मैना…”
लावणीचे शब्द पुढे सरकत होते आणि त्यासोबत शकुंतलाबाईंची अदाकारीही हळूहळू खुलत होती. कधी लाडिक रुसवा, कधी मिश्कील हास्य, कधी लाजरेपणाची हळुवार छटा, तर कधी डोळ्यांच्या एका कटाक्षातून उमटणारी भावमुद्रा—त्यांच्या सादरीकरणात शृंगार होता; पण तो केवळ बाह्य नव्हता. त्या शृंगाराला अभिनयाची जाण होती, नृत्याची शिस्त होती, शब्दांची जाण होती आणि लोकपरंपरेतून आलेली एक सोज्वळ अभिव्यक्ती होती.
नऊवारीच्या पदराला अलगद सावरत केलेली त्यांची लयबद्ध हालचाल, पावलांमधील ठेका, हातांच्या बोटांची नजाकत आणि चेहऱ्यावर क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावछटा यांतून लावणी जिवंत होत होती. त्यांच्या डोळ्यांतून जणू एक वेगळीच भाषा बोलत होती. त्या भाषेला शब्दांची गरज नव्हती. एक कटाक्ष पुरेसा होता, एक हलकीशी मान वळवणं पुरेसं होतं आणि कधी ओठांवर उमटलेलं मंद हास्यच अख्ख्या लावणीचा अर्थ सांगून जात होतं.
पहिल्या रांगेत मुख्यमंत्री विलासराव देशमुख बसले होते. मंत्रालयात जाण्याची घाई असलेले मुख्यमंत्री आता मात्र त्या लावणीत रमले होते. कार्यक्रम आटोपताच मंत्रालयात परतण्याची त्यांची घाई कुठेच दिसत नव्हती. ते त्या क्षणी मुख्यमंत्री नव्हते; ते होते एक जाणकार, रसिक प्रेक्षक. रंगमंचावरच्या कलेला मनापासून दाद देणारे एक रसिक मन.
टाळ्यांच्या कडकडाटातून त्यांची दाद व्यक्त होत होती. त्यांच्या चेहऱ्यावर कलाकाराच्या सादरीकरणाचा आनंद स्पष्ट दिसत होता. इकडे रंगमंचावर लावणी रंगत चालली होती आणि तिकडे अधिकाऱ्यांमध्ये मात्र चुळबूळ सुरू झाली होती. मुख्यमंत्री कधी उठतात, याकडे त्यांचे लक्ष लागले होते. मंत्रालयातील बैठका, वेळापत्रक आणि पुढील कार्यक्रम यांची गणिते त्यांच्या मनात सुरू असणार; पण विलासराव त्या क्षणी त्या सगळ्या जगापासून काही काळ दूर गेले होते.
एक-दोन मिनिटांचा वाटणारा कार्यक्रम कधी दीड तासाच्या कलानुभवात बदलला, हे कदाचित कुणालाच कळले नाही. कारण शकुंतला नगरकरांची लावणी केवळ पाहण्याची गोष्ट नव्हती; ती अनुभवण्याची गोष्ट होती. त्यांच्या कलेतला शृंगार हा देहाच्या प्रदर्शनापेक्षा भावनेचा खेळ होता. स्त्रीसौंदर्याचा डौल होता; पण त्यामागे अभिनयाची समृद्ध जाण होती. नजरेत खट्याळपणा होता; पण त्याच्या मुळाशी भावाभिनयाची प्रदीर्घ परंपरा होती. देहबोलीत लय होती; पण त्या लयीला शब्द, संगीत आणि तालाची समर्थ साथ होती.
*हीच तर अस्सल लावणी*!
लावणीच्या शृंगारिकतेचा अर्थ केवळ देहभाषेत शोधणाऱ्यांना शकुंतला नगरकरांच्या कलेचे खरे सामर्थ्य कदाचित कधीच समजणार नाही. कारण त्यांच्या अदाकारीत शृंगाराला संस्कारांचा पदर होता. नजाकतीला मर्यादेचे भान होते आणि ठसक्याला परंपरेची बैठक होती. म्हणूनच त्यांची लावणी पाहताना रसिक केवळ एका स्त्रीची अदाकारी पाहत नसे; त्याला महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा, भाषेचा, संगीताचा आणि अभिनयपरंपरेचा एक जिवंत आविष्कार अनुभवायला मिळत असे.
लोककलेचे हेच तर सामर्थ्य आहे. ती राजकारणी असो, अधिकारी असो किंवा सामान्य रसिक—काही क्षणांसाठी प्रत्येकाला त्याच्या पदापासून, प्रतिष्ठेपासून आणि रोजच्या जगण्याच्या व्यापापासून दूर नेते आणि कलेच्या विश्वात घेऊन जाते. विलासराव देशमुख यांच्यासारख्या कला रसिकाला शकुंतला नगरकरांच्या लावणीने दीड तास खिळवून ठेवले, ही केवळ आठवण नाही; ती एका अस्सल लोककलावंताच्या कलेची ताकद सांगणारी जिवंत कहाणी आहे.
पण शकुंतलाबाईंच्या कलेची बीजे या मोठ्या रंगमंचांवर नव्हे, तर त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर रुजली होती.त्यांच्या आई छबूबाई नगरकर या कोल्हाटी समाजातील जातिवंत लोककलावंत होत्या. छबूबाईंनी तमाशाचा फडही काढला होता. नृत्याची लय आणि सुरेल कंठ ही त्यांची ओळख होती. मुंबईच्या पिला हाऊसमध्ये काही वर्षे नृत्य सादर करणाऱ्या छबूबाईंनी आपल्या लेकीच्या मनातही कलेचे बीज अलगद रुजवले. कथक नृत्याचे प्राथमिक धडे त्यांनी शकुंतलाबाईंना दिले. त्या तालमींतून त्यांच्या पावलांना लय मिळाली, देहबोलीला नजाकत लाभली आणि नृत्याच्या प्रत्येक वळणाला अभिनयाचा स्पर्श मिळत गेला.जणू आईच्या घुंगरांचा नादच लेकीच्या पावलांत उतरला होता.पुढे याच पावलांनी महाराष्ट्राच्या असंख्य रंगमंचांवर लावणीचा ठेका धरला.
लावणी शकुंतलाबाईंसाठी केवळ मनोरंजनाची रंगत नव्हती; ती त्यांच्या जगण्याची भाषा होती, त्यांच्या भावविश्वाचा स्वर होता आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख होती. त्यांच्या लावणीत नटखटपणा होता, शृंगाराची हळुवार झुळूक होती, प्रणयाची मिश्कील छटा होती; पण त्यावर संस्कारांचा पदर घट्ट पांघरलेला होता. त्यांच्या डोळ्यांची एक हलकीशी हालचाल, भुवयांचा नाजूक कटाक्ष, हातांच्या बोटांची लयबद्ध नजाकत आणि पावलांतील घुंगरांचा झंकार—या साऱ्यांतून लावणीला जणू प्राणवायू मिळत असे.
त्या रंगमंचावर उभ्या राहिल्या की शब्दांना देह मिळे, सुरांना पावले फुटत आणि भावनांना नृत्याची पंखे लाभत.
हजारो रसिकांच्या मनावर आपल्या कलेची मोहिनी पसरविणाऱ्या शकुंतलाबाईंना लोककलेचे सामाजिक भानही तितकेच खोल होते. लोककला ही केवळ एका पिढीची मिरासदारी नसून पुढच्या पिढीच्या हातात सोपवायची सांस्कृतिक ठेव आहे, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच राज्य शासनाच्या विविध तमाशा आणि लावणी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्यांनी नव्या पिढीतील कलाकारांना पारंपरिक कलेचे धडे दिले. आयुष्यभराच्या साधनेतून मिळालेली अनुभवाची शिदोरी त्यांनी स्वतःपुरती जपून ठेवली नाही; उलट ती पुढच्या पिढीच्या ओंजळीत मुक्तहस्ताने ठेवली.हीच त्यांच्या कलेची खरी उदारता होती.
सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात त्यांनी सादर केलेली पारंपरिक लावणी हा त्यांच्या कलाप्रवासातील आणखी एक संस्मरणीय अध्याय. लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासोबत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला होता. त्यांच्या लावणीचा तो ठसका, भावमुद्रांची ती श्रीमंती आणि घुंगरांच्या निनादातून उलगडणारे ते कलावैभव आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मरणात ताजे आहे.
मुंबई-पुण्यासारख्या महानगरी रंगभूमीवर वावरणारे रंगकर्मी, कलावंत आणि जाणकार रसिकही त्यांच्या लावणीसमोर क्षणभर थबकत. कारण त्यांच्या सादरीकरणात केवळ देहाची लय नव्हती; तिच्या मागे परंपरेची मुळे होती, अभिनयाची जाण होती आणि लोकजीवनाशी जोडलेली संवेदनशीलता होती. त्यांच्या लावणीच्या ठेक्यावर उमटणाऱ्या टाळ्यांमध्ये केवळ कलाकाराला मिळणारी दाद नसे; महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला मिळणारा सन्मानही त्यात दडलेला असे.
त्यांच्या या प्रदीर्घ कलासाधनेला सन २००९ मध्ये मानाचा मुजरा लाभला. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ एका कलाकाराच्या कर्तृत्वाची पावती नव्हती; महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक लावणीच्या वैभवावर उमटलेली राष्ट्रीय मान्यतेची मोहोर होती.आणि मग आला—३ डिसेंबर २०२५.
कदाचित त्यांच्या आयुष्यातील तो शेवटचा सार्वजनिक सोहळा ठरला.गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिल्या. शरीर थकले होते. काळाने चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा उमटवल्या होत्या. मात्र कलेविषयीचे प्रेम डोळ्यांत अजूनही तितकेच टवटवीत होते. आयुष्यभर ज्या कलेसाठी घुंगरू बांधले, ज्या लावणीसाठी रंगमंचावर असंख्य वेळा पावले थिरकवली, त्याच कलेच्या सन्मानाचा तो क्षण त्यांच्या जीवनातील अखेरचा आनंदसोहळा ठरला.
जणू आयुष्यभराच्या कलासाधनेने अखेरच्या क्षणी त्यांच्या कपाळावर मानाचा कुंकवटाच भरला होता.
आज त्यांच्या पावलांचा ठेका रंगमंचावर ऐकू येत नाही. हातांची ती नाजूक लय, डोळ्यांतून उमटणारी ती बोलकी अदाकारी आणि ओठांवरून अलगद झरणारी लावणीची ती ओळ पुन्हा प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही. पण काही कलावंतांच्या जाण्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीपेक्षा त्यांची उपस्थिती अधिक जाणवू लागते. शकुंतला नगरकर त्यापैकीच एक.
त्या एखाद्या जुन्या सुरासारख्या स्मरणात राहतील. एखाद्या मंद वाऱ्यासोबत पुन्हा कानावर येतील. एखाद्या नव्या कलाकाराच्या पावलांतून पुन्हा घुंगरू बनून झंकारतील.
*शकुंतला नगरकर गेल्या; पण त्यांनी जपलेली लावणी गेली नाही*.
त्यांनी सांभाळलेला पारंपरिक बाज मावळला नाही. त्यांच्या अदाकारीची मोहिनी विरली नाही. त्यांनी पुढच्या पिढीच्या ओंजळीत ठेवलेला लोककलेचा वारसा हरवला नाही.
निमगाव वाघाच्या मातीत उमललेले हे कलापुष्प काळाच्या वादळाने कोमेजले असेल; पण त्याचा सुगंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशात दीर्घकाळ दरवळत राहणार आहे.
लोकपरंपरेच्या आकाशातील हा तेजस्वी तारा आज दिसेनासा झाला आहे; मात्र त्याच्या कलेचा प्रकाश लावणीच्या प्रत्येक ठेक्यात, प्रत्येक घुंगराच्या नादात आणि प्रत्येक रसिकाच्या स्मरणात झळकत राहील.
म्हणूनच आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना तो प्रसंग पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो—मंत्रालयातील बैठकींची घाई असतानाही मुख्यमंत्री विलासराव देशमुख लावणीच्या बैठकीत रमले होते. अधिकाऱ्यांच्या नजरा घड्याळाकडे होत्या; पण विलासरावांच्या नजरा रंगमंचावर खिळल्या होत्या. कारण त्या दिवशी रंगमंचावर केवळ शकुंतला नगरकर नव्हत्या; रंगमंचावर लावणीची परंपरा उभी होती.
आणि समोर बसले होते तिचे एक खरेखुरे रसिक.त्यामुळे लोककलेला राजश्रय देणारा असा नेता आता पुन्हा होणे नाही, तसं शकुंतला नगरकर सारखी परंपरा जपणारी कलावती पुन्हा जन्माला येणे शक्य नाही.
आज घुंगरांचा नाद थांबला आहे. रंगमंचावरची ती पावले थांबली आहेत. नऊवारीच्या पदराची ती लय आता केवळ स्मृतीत उरली आहे. पण काही नाद थांबूनही थांबत नाहीत, काही पावले थांबूनही काळाच्या वाटेवर उमटत राहतात आणि काही अदाकारी पडदा पडल्यानंतरही रसिकांच्या मनातून कधीच उतरून जात नाहीत.
शकुंतला नगरकरांची लावणी अशीच आहे—
काळाच्या तालावर सदैव निनादत राहणारी…
आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीत सदैव जिवंत राहणारी आहे.
ले. खंडूराज शं. गायकवाड
Khandurajgkwd@gmail.com
(लेखक हे मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार असून लोककलेचे अभ्यासक आहेत.)




