सातारा : ऐतिहासिक सातारा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी तसेच शिवतीर्थ परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या २४ तासांत निधी मंजूर केला आहे.
शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण आणि छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सातारा नगरपालिकेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. गुरुवार, दि. १२ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे येथे मुक्कामी असल्याची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची रात्री भेट घेतली. यावेळी शिवतीर्थावरील पुतळा उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
त्यानुसार शुक्रवार, दि. १३ रोजी नगरविकास विभागाने विशेष अनुदान योजनेतून ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
हुबेहूब जुन्या पुतळ्याच्या स्वरूपात नवा पुतळा
शिवतीर्थावर सध्या तोफेवर हात ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वरूपातच नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. १५ फूट उंचीचा चबुतरा आणि २५ फूट उंचीचा पुतळा अशी एकूण ४० फूट उंचीची भव्य वास्तू साकारली जाणार आहे.
या निधीबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि सातारकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




