सातारा(अजित जगताप ) : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिल्हा बँकेला कोणत्याही स्वरूपाची जाहिरात देता येणार नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वीच लाखो रुपयाची बचत झाल्याने जिल्हा बँकेचे सभासद व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे अनेक दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंक व युट्युब समाज माध्यमावर अधून मधून अंक काढणारे सुद्धा जिल्हा बँकेची जाहिरात दिवाळीनिमित्त प्रसिद्ध करतात. यासाठी जिल्हा बँकेच्या तिजोरीतून लाखो रुपये अदा करावे लागते. जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर दिवाळीनिमित्त जशा पद्धतीने ॲटम बॉम्ब ते अनेक फटाक्यांची मागणी केली जाते. त्या पद्धतीने बँकेची जाहिरात मिळवण्यासाठी अनेक जण अपील सादर करतात. हेलपाटे मारतात. त्यानंतर पंधरा दिवसांनी प्रत्येकाच्या खात्यामध्ये दोन ते वीस हजारापर्यंत आणि काहींची जाहिरात रक्कम ही अधिक असते. परंतु, त्याची कुठेही नोंद ठेवली जात नाही. पण यंदाच्या वर्षी जिल्हा बँकेची निवडणूक दिवाळीच्या तोंडावर असल्यामुळे जिल्हा बँकेचे लाखो रुपये आता बचत होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर ते एक आक्टोंबर संचालक पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणे व पाच ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी त्यानंतरचा ६ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेणे. एक नोव्हेंबर रोजी मतदान आणि तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे . जिल्हा बँकेचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असला तरी शेतकरी सभासद खुश झाले आहेत.
——————
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य इमारत (छाया- निनाद जगताप सातारा)




