ताज्या बातम्या

सेना नेत्यांसोबत दरे भेटीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केली राजकीय दरी कमी…..

तापोळा(अजित जगताप ) ; जावळी तालुक्यातील भाजपा राजे समर्थक व सेना- राष्ट्रवादी समर्थक यांच्या मेढा येथील मोर्चा व प्रति मोर्चाने वातावरण ढवळून निघाले आहे. यातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या दरेतांब गावी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीने भाजप- सेना दरी कमी झाल्याचे मानण्यात येत आहे.
सातारा नगरपालिकेच्या हद्दीत शाहू कला मंदिर नूतनीकरण, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची उंची वाढवणे, शहरातील प्रमुख दोन रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढी बाबत मंजूर निधी त्वरित मिळावा आणि शहरातील विविध विकासकामांबाबत प्राधान्य देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदरपूर्वक स्वागत करून मानसन्मान दिला. याचाच अर्थ मेढ्यातील मोर्चामध्ये कोण काय बोलतोय? याकडे मी लक्ष देत नाही. असाच अर्थ काढण्यात येत आहे. त्यामुळे भाजप गोटामध्ये चैतन्य पसरले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी ऐतिहासिक भेट झाली. यावेळी सातारा नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम आणि नगरसेवक फिरोज पठाण यांच्या प्रभागातील तसेच सातारा शहरातील विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सातारा शहरासाठी लागणारा निधी नगर विकास खात्यातून देण्यात येईल. आपल्यासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही. असे आश्वासित करण्यात आले. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी चांगल्या प्रकारे नगर विकास खाते सांभाळले होते. त्यामुळे आजच्या भेटीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. दरेतांब या ठिकाणी दिवाळीनंतर सेना नेत्यांना भेटण्यासाठी अनेक जण आवर्जून आले होते. परंतु, राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भेटीला प्राधान्य देण्यात आले तसेच त्यांनी सुचवलेली विकास कामे तातडीने मंजूर करण्याबाबत हालचाली करण्यात आल्या. यामुळे ही भेट यशस्वी झाली आहे. या भेटी दरम्यान दुरान्वये सुद्धा जिल्हा बँकेबाबत चर्चा झाली नाही. असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सांगितले. याला साताऱ्यातील वरिष्ठ नगरसेवकांनीही दुजोरा दिला आहे.
शिवसेनेचे नेते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी जावळी तालुक्यामध्ये शिवसैनिकांची भेट घेतली. त्यानंतर आज भाजप नेते व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा या ठिकाणी महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यामुळे महायुती मधील संघर्ष मावळला असून वाचाळ वीरांना चपराक बसल्याचे बोलले जात आहे.

Scroll to Top