मुंबई प्रतिनिधी : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभादेवी-दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘शरद रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सचिव हरिश्चंद्र जंगम, उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, कार्याध्यक्ष गणेश पाटील, ॲड. प्रल्हाद भिलारे आणि खजिनदार सुरेश पाटील यांनी केली.
या पुरस्कारांमध्ये सामाजिक, राजकीय, कामगार, पत्रकारिता, आरोग्यसेवा, वैद्यकीय, कला, सांस्कृतिक, उद्योजकता आणि युवा नेतृत्व अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. माजी खासदार समाजसेवक रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार, जयंत पाटील(शेकाप) यांना सामाजिक सेवा, शशिकांत शिंदे यांना कामगार क्षेत्र, दीपक भातुसे यांना पत्रकारिता, मंगेश चिवटे यांना आरोग्यसेवा, अमित ठाकरे व रोहित पवार यांना युवा नेतृत्व, डॉ. निळकंठ शिवाचार्य (धारेश्वर महाराज) तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांना धार्मिक व कीर्तन क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
अभिनेते किरण माने, आगरी-कोळी समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या जानकीबाई वासकर, डॉ. मदन कोठुळे, संजय (बाबा) गायकवाड, डॉ. कनक नागले, उद्योजक हर्षवर्धन देशमुख, तसेच दैनिक ‘पुण्यप्रताप’चे संपादक विवेकानंद पाटील,चंद्रकांत दळवी, विकी खोकरे, यांचाही पुरस्कारासाठी समावेश आहे. तमाशा कलावंत चंद्रकांत गुढेकर यांना ( कै. पांडुरंग गुढेकर मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
३६ जिल्ह्यांतील कलाकारांना व्यासपीठ
या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, समयी नृत्य, लावणी, बतावणी, पोवाडा, अभंग, गवळण तसेच पारंपरिक गीतांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय शरदचंद्र पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे.
वारकरी दिंडी ठरणार आकर्षण
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वारकरी दिंडी सोहळा. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, डी. एल. रोड येथून दिंडीचे प्रस्थान होणार असून ३६ जिल्ह्यांतील कलाकार विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून दिंडी सोहळ्याची सांगता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होईल.
दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुरस्कार वितरण आणि विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि वारकरी परंपरेला प्रोत्साहन देतानाच नवोदित तसेच उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी सांगितले. ७ ऑक्टोबरच्या पुरस्कार सोहळ्याची रूपरेषा आणि पूर्वतयारीबाबतची माहिती प्रतिष्ठानच्या बैठकीत यापूर्वीही जाहीर करण्यात आली होती.
या सोहळ्यास राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री संजय शिरसाट, मकरंद आबा पाटील, भरतशेठ गोगावले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




