यावेळी महापौर महोदयांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे उपक्रम राबविण्याचे सूचित केले. यामध्ये जन्म – मृत्यू तसेच इतर प्रमाणपत्रांमधील प्रलंबितता दूर करण्याच्या दृष्टीने धडक मोहीम राबवावी असे निर्देश दिले तसेच दिव्यांगांना नवी मुंबईतच दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अभियानामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे तसेच शासकीय व महानगरपालिकेच्या योजनांची माहिती व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डिजीटल प्रचार – प्रसिध्दीवर अधिक भर देण्याचे सूचित करण्यात आले.
नवी मुंबईत व्यापक स्वरूपात वृक्षारोपण मोहीमा राबविताना त्यामध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे व वृक्षारोपण स्थळांची निवड करताना त्यांच्या सूचना घ्याव्यात असे सूचित करीत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाल्याचे लक्षात घेऊन प्राधान्याने अशा झाडे पडलेल्या ठिकाणीच नवीन झाड लावण्याची मोहीम हाती घ्यावी अशाही सूचना केल्या.
प्लास्टिकमुक्तीचे काम करणा-या संस्थांना या अभियानाशी जोडण्यात यावे तसेच वनहक्क समिती पुनर्जिवित करून आदिवासी समाजासाठी भरीव काम करण्याचेही महापौरांनी सूचित केले. तसेच विद्यार्थ्यांना या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे अशाही सूचना देण्यात आल्या.
उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी सुगंधी अंगण अभियान हा नागरिकांना स्वच्छता आणि आरोग्याशी आपुलकीने जोडणारा व त्यांची बांधिलकी व जबाबदारी निश्चित करणारा घटक असल्याचे स्पष्ट करीत या अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे सूचित केले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सेवा संकल्प अभियानात सर्व विभागांनी पुढाकार घेऊन काम करण्याचे निर्देश देत प्रत्येक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्याच्या सूचना केल्या. अभियानकाळात व पुढेही नागरिकांशी जोडलेल्या विषयांना प्राधान्याने हाताळण्याचे निर्देशित करीत विभाग पातळीवर होणारे कार्यक्रम नियोजनबध्द व्हावेत यादृष्टीने विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी प्रत्येक विभागासाठी नियुक्त करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. उपक्रम करण्यासोबतच्या त्याच्या डॉक्युमेन्टेशनवर भर देण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
आपल्या राज्यातील गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासनाने bappa.org या पोर्टलवर घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाची नोंद नागरिकांनी फोटो / व्हिडीओसह करण्याचे आवाहन केले असून या मोहीमेमध्येही जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांनी सहभागी होऊन नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे सूचित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारताचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकाळातील ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून यामध्ये सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारीवृंदासह सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केले आहे.