महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ‘गणेशोत्सव’ हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असताना महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या संकल्पनेतून, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कलागणेश महोत्सव’ या विशेष उपक्रमाचे विष्णुदास व्हावे नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार – गायक डॉ.सलील कुलकर्णी यांनी ‘सूर नवा ध्यास नवा ‘ फेम गायिका सन्मिता धापटे – शिंदे यांच्यासह ‘हे गजवदन…’ ही भक्ती गीतांची सुरेल मैफल सादर करून रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री. राजू मढवी, नगरसेवक श्री.विशाल विचारे, नगरसेविका श्रीम. संतोषी म्हात्रे व श्रीम. दीक्षा कचरे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भक्तीगीत गायन सुरू असताना श्री.सागर जाधव या चित्रकाराने कॅनव्हासवर श्री गणेशाची प्रतिमा रेखाटण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे श्रीम.मयुरी ठाकरे व श्री.जतिन पाटील या मूर्तिकारांनी श्री गणेश मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी पूर्ण झालेली श्रीगणेशाची चित्राकृती उपसभापती श्री.रॉबिन मढवी यांचेकडे प्रदान करण्यात आली.
यावेळी विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये श्री.आशिष तांबे या सुलेखनकाराने अष्टविनायकांच्या नावांतून साकारलेल्या श्री गणेशचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
Bappa.org पोर्टलवर घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती व छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन
यावेळी बाप्पा डॉट ओआरजी (bappa.org) या श्रीगणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती व कला जागरतिक स्तरावर संग्रहित करणा-या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने जाहीर ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या अंतर्गत ‘गाथा गणेश कथांची’ या उपक्रमात घरगुती अथवा मंडळाच्या गणपतीची छायाचित्र अथवा व्हिडीओसह माहिती bappa.org या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर एका क्षणात आपला सण जगासमोर प्रदर्शित होईल आणि युनोस्कोच्या वारसा यादीत आपल्या गणेशोत्सव सणाला जागतिक स्तरावर स्थान मिळविण्यासाठी आपले योगदान लाभेल. यादृष्टीने घरगुती व सार्वजनिकरित्या गणपती प्रतिष्ठापित करणा-या प्रत्येक नागरिकाने आपल्या गणेशाची कथा, पाककृती, परंपरा, आरती गुगलवर bappa.org टंकलिखीत करून अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले.