मुंबई : लय भारी Production प्रस्तुत ‘भाड्याचे घर’ या भावनिक आणि कौटुंबिक लघुपटाला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या लघुपटाने जवळपास ३० हजार व्ह्यूज आणि २०७ लाईक्सचा टप्पा गाठला असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि कमेंट्समुळे संपूर्ण टीमचा उत्साह वाढला आहे.
‘घर’ म्हणजे केवळ चार भिंतींची वास्तू नसून, प्रेम, आपुलकी, नाती आणि भावनांनी त्याला खऱ्या अर्थाने ‘घरपण’ प्राप्त होते. याच संवेदनशील भावनेला स्पर्श करणारी कथा ‘भाड्याचे घर’ या लघुपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन, संकल्पना व पटकथा प्रमोद सूर्यवंशी यांनी केली असून, कथा रेखा चंद्रकांत हरियाण यांची आहे. संवाद लेखन प्रमोद सूर्यवंशी व सौ. वसुधा नाईक यांनी केले आहे. तर छायाचित्रण व एडिटिंग कुणाल मगर यांनी केले आहे.
लघुपटामध्ये उत्तम कुलकर्णी, किशोरी पाटील, हरीशचंद्र दळवी आणि युवराज्ञी सोनवणे यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथेला भावनिक उंची दिली असून, त्यांच्या मेहनतीचे रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
लघुपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल निर्मिती टीमने रसिकांचे आभार मानले आहेत. “आपली प्रत्येक लाईक म्हणजे कलाकारांचा उत्साह, प्रत्येक कमेंट म्हणजे त्यांच्या मेहनतीला मिळालेली दाद आणि प्रत्येक शेअर म्हणजे कलाकृतीला मिळालेली नवी वाट आहे,” अशा भावना टीमने व्यक्त केल्या.
कलाकार केवळ पडद्यावर घडत नाहीत, तर रसिकांचे प्रेम, प्रोत्साहन आणि कौतुक यामुळे त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ‘भाड्याचे घर’ या लघुपटाला मिळणारा वाढता प्रतिसाद संपूर्ण टीमसाठी निश्चितच उत्साहवर्धक ठरत आहे.
लय भारी Productionच्या संपूर्ण टीमचे तसेच या कलाकृतीला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे अभिनंदन होत आहे.




