कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील एका गटामध्ये २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय बियाणे योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी धगधगती मुंबईचे कराड प्रतिनिधी प्रताप भणगे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांच्याकडे २२ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.
अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या एका गटामध्ये २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असल्याने ते शासकीय योजनेस पात्र असूनही बियाणे लाभापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केवळ गटाचे क्षेत्रफळ विचारात न घेता प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र, पीक, ई-पिक पाहणी, ७/१२ उतारा आणि योजनेच्या पात्रतेचे निकष तपासून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पात्र शेतकऱ्यांना क्षेत्राच्या कारणामुळे वंचित ठेवू नका
२० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे लाभ नाकारण्यामागील नियम व शासन निर्णय स्पष्ट करावा. संबंधित प्रकरणांची तालुकास्तरावर चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष तरतूद किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गावनिहाय लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यावर योग्य कार्यवाही करावी आणि संबंधित कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा समान व पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी कराडचे धगधगती मुंबईचे पत्रकार प्रताप भणगे यांनी केली आहे.




