मसूर : लायन्स क्लब मसूरच्या वतीने विठ्ठल गणेश मंडळ, मसूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ॲड. दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल, माळवाडी येथील नर्सिंग व फार्मसी विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे शिबिराला मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची तसेच बॉडी मास इंडेक्स (BMI) आदी आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. सुमारे २०० नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
याचवेळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
शिबिरास जिल्हा परिषद सदस्य श्री. लालासाहेब जगदाळे बाबा, डॉ. सौ. मैथिली मिरजे, प्राथमिक आरोग्य केंद्र मसूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा बादल, लायन्स क्लब मसूरचे अध्यक्ष ला. डॉ. विक्रम शिंदे, गट एरिया लीडर ला. जगदीश पुरोहित, ला. डॉ. रमेश लोखंडे, ला. रमेश जाधव, ला. सदाशिव रामुगडे सनी, ला. जितेंद्र निकम यांच्यासह लायन्स क्लब मसूरचे सर्व सदस्य उपस्थित होते.
तसेच श्री. संजय शिरतोडे नाना, संभाजी जगदाळे, अपूर्व शहा, सुनील शेटे, शुभम शेटे, विठ्ठल गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य तपासणी व रक्तदानाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




