ताज्या बातम्या

पिक पाहणीच्या कामामुळे रेकॉर्ड रूमचा कारभार ठप्प? कागदपत्रांसाठी नागरिकांचे तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे; कराड तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

कराड : कराड तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममधून आवश्यक कागदपत्रे, जुन्या नोंदी व दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रेकॉर्ड रूममधील कर्मचारी पिक पाहणीच्या कामासाठी बाहेर असल्याचे कारण सांगितले जात असल्याने, कागदपत्रांसाठी आलेल्या नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जमीन, वारसाहक्क, शेतजमीन, विविध शासकीय योजना तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना जुन्या महसूल नोंदी व कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिक तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूमकडे धाव घेतात. मात्र संबंधित कर्मचारी पिक पाहणीच्या कामात असल्याने रेकॉर्ड रूममधील कामकाजावर परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
एकाच कामासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या
अनेक नागरिकांनी अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने संबंधितांना पुन्हा-पुन्हा कराड तहसील कार्यालयात यावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही नागरिक ग्रामीण भागातून प्रवास करून कार्यालयात येतात. प्रवासाचा खर्च, वेळ आणि कामाचा दिवस वाया जात असतानाही अपेक्षित कागदपत्र मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पिक पाहणी महत्त्वाची; मात्र रेकॉर्ड रूमचे कामही थांबू नये
ई-पिक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया असून पीक नोंदणीचा उपयोग पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती मदत, एमएसपी अंतर्गत नोंदणी आणि विविध शासकीय योजनांसाठी होतो, अशी अधिकृत माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली आहे.
मात्र पिक पाहणीचे काम सुरू असताना रेकॉर्ड रूममधील नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत, अशी मागणी होत आहे. पिक पाहणीसाठी कर्मचारी आवश्यक असल्यास पर्यायी कर्मचारी व्यवस्था करून रेकॉर्ड रूमचे नियमित कामकाज सुरू ठेवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी
एकीकडे शासनाकडून नागरिकांना विविध सेवा वेळेत देण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील तर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
कराड तहसीलदारांनी रेकॉर्ड रूममधील प्रलंबित अर्जांची माहिती घेऊन किती नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यामागील कारण काय आहे आणि कागदपत्रे देण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, याबाबत स्पष्ट कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिक पाहणीचे कामही महत्त्वाचे आणि नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळणेही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे दोन्ही कामांचा समन्वय साधून नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Scroll to Top