कराड : पाचवड फाटा–नारायणवाडी मार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, विविध प्रकारचा घनकचरा तसेच इतर टाकाऊ साहित्याचा ढीग साचलेला दिसत आहे.
कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असून, मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. नागरिक व वाहनचालकांना या ठिकाणाहून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात असताना सार्वजनिक रस्त्यालगत अशा पद्धतीने कचरा साचणे ही चिंतेची बाब आहे. संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने कचरा हटवून या ठिकाणी नियमित स्वच्छता करावी आणि पुन्हा कचरा टाकला जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
“कचरा हटवा, परिसर स्वच्छ ठेवा; प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे!” अशी नागरिकांची अपेक्षा आहे.




