तळमावले/वार्ताहर : समाजात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यंदापासून ‘स्व. राजाराम डाकवे (तात्या) सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. सन २०२६ या पहिल्या वर्षाचा हा मानाचा पुरस्कार शिवसमर्थ समूहाचे संस्थापक/अध्यक्ष ॲड.जनार्दन बोत्रे यांना जाहीर झाला आहे.
स्व.राजाराम (तात्या) डाकवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार तळागाळात ठोस सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तीस प्रदान केला जातो. ॲड. जनार्दन बोत्रे यांनी ‘शिवसमर्थ समूहा’च्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची आणि विकासातील योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तात्या पुस्तक असे आहे.
या पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवार दि.28 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.
या दिमाखदार सोहळ्याला महंत अहिल्यागिरीजी महाराज (शिवदत्त मठ, कापुसेवाडी), संभाजीराव पाटणकर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), प्रदीप कांबळे (वक्ते, लेखक व कवी), डॉ.राजेंद्र कंटक (गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर), विशाल पाटील (सातारा जिल्हा प्रतिनिधी, न्यूज १८ मराठी), अमित देशमुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड पूर्व उपविभाग), सानिका माने (इन्स्टाग्राम रील्स स्टार) मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सन २०२६ च्या या पहिल्या पुरस्कारासाठी ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या नावाची घोषणा शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून ॲड. बोत्रे यांचे अभिनंदन होत आहे.




