नवी मुंबई : नेरुळमधील शिरवणे गाव परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 352 आणि 351(2) अंतर्गत असंज्ञेय गुन्ह्याची (NCR) नोंद केली आहे.
पोलिस नोंदीनुसार, तक्रारदार अनिकेत राजू राठोड (वय २६), रा. शिरवणे गाव, नेरुळ, नवी मुंबई यांच्यावर २० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शिरवणे गाव परिसरात मारहाण झाल्याची तक्रार आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याचा मित्र अर्जुन गुप्ता याच्यासोबत यापूर्वी विरोधकांचा वाद झाला होता. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून विरोधकांनी तक्रारदाराला कथितरित्या हाताने व चापटांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केली.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही हल्ला करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा झालेल्या वादाच्या वेळी आरोपींनी, “आम्हाला सहा महिने जेल झाली तरी चालेल, पण तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही,” अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराच्या मित्रालाही पुन्हा मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात विशाल यादव, अनिकेत पाईक आणि आशूतोष पाटील यांच्याविरोधात NCR नोंदविण्यात आली आहे. साक्षीदार म्हणून प्रदीप जयाराम मोर्या, रा. शिरवणे गाव, नेरुळ यांचे नाव नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची नोंद असंज्ञेय (Non-Cognizable) स्वरूपाची असून संबंधित तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याबाबत पोलिसांकडून सूचना देण्यात आल्याचे NCR अहवालात नमूद आहे. धमकी व यापूर्वीच्या हल्ल्याच्या आरोपांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रियेत काय निष्पन्न होते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.




