नेरळ : गौरी-गणपती विसर्जनानिमित्त दहिवली गणेश घाटावर यंदाही गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दहिवली ग्रुप ग्रामपंचायत परिसरासह नेरळ आणि आसपासच्या भागातील अनेक गणेशभक्त रात्री उशिरापर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घाटावर दाखल होत होते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जनासाठी आवश्यक सुविधा आणि नियोजन करण्यात आले होते.
माजी सभापती अमर मिसाळ यांच्या पुढाकारातून तसेच दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विसर्जनासाठी येणाऱ्या गणरायावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत होते. यावेळी सरपंच सौ. मेघा अमर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य नरेश कालेकर, यशवंत भवारे, स्वाती विरले, तसेच विनोद माळी, सुनील विरले, कैलास विरले आदी उपस्थित होते. त्यांनी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचे स्वागत केले.
विशेष म्हणजे यंदा विसर्जनस्थळी सुगम संगीताची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय आणि सुगम संगीताच्या गजरात गणरायाचे स्वागत करत भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.
गणेश घाट परिसरात पुरेशा प्रकाशव्यवस्थेसह भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तसेच विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत विसर्जन प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होती.
श्री सदस्यांची निर्माल्य संकलनाची अखंडित सेवा
७०० ते ८०० किलो निर्माल्य संकलित
गणेशोत्सवादरम्यान नदीमध्ये निर्माल्य टाकल्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी दहिवली येथील श्री सदस्यांकडून दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही दहिवली गणेश घाटावर ही सेवा अखंडितपणे सुरू ठेवत सुमारे ७०० ते ८०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. कोदिवले येथेही श्री सदस्यांकडून अशाच प्रकारे निर्माल्य संकलन करण्यात आले. तसेच उल्हासनदी बचावच्या माध्यमातूनही दरवर्षी भाविकांना नदी प्रदुषणविरहीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन श्री केशव तरे यांच्याकडून करण्यात येते.
या उपक्रमात रमेश कुंभार, अनिल बार्णेकर, चेतन पाटील, भूषण बार्णेकर, श्रवण भवारे, शशिकांत ठमके, स्वप्नील डोईफोडे, गजानन ठमके, दिगंबर डोईफोडे, वसंत पेमारे, प्रमोद पेमारे, अनिल मते, मिलिंद बार्णेकर, सुनील बार्णेकर, मिलिंद भवारे, जितेंद्र भवारे, साहिल कहारे, रघुनाथ भोईर, शांताराम भवारे, अविनाश मते, राजेश भवारे, मनोज ठमके, रूपेश ठमके, अक्षय भोईर, महेंद्र मराडे, विलास रसाळ, कैवल्य ठमके, गोविंद घुले, दशरथ भवारे आणि व्यंकट मुंडे आदी श्री सदस्यांनी सहभाग घेतला.
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही यंदाच्या विसर्जन सोहळ्यात देण्यात आला.




