ताज्या बातम्या

आदर्श माता यशोदा शेवाळे यांच्या स्मरणार्थ जय महाराष्ट्र गणेश मंडळामार्फत मोफत आयुर्वेदिक निदान व आरोग्य तपासणी शिबिर

कराड (वार्ताहार) : येवती, ता. कराड येथील कै. आदर्श माता यशोदा शेवाळे यांच्या स्मरणार्थ जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जयवंत नगर, किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ, येवती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग आयुर्वेदिक निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर मंगळवार, दिनांक २२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, येवती व परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने विविध आजारांचे निदान व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सांधेदुखी, अर्धांगवायू, गुडघेदुखी, मणक्यांचे विकार, मधुमेह, मूत्रखडा व मूत्रमार्गाचे विकार, पित्तविकार, रक्ताचे विकार, स्थूलपणा, कावीळ व यकृताचे विकार, त्वचारोग, स्त्री-पुरुष वंध्यत्व, सौंदर्यविषयक समस्या, पाठीच्या समस्या, कफ विकार, दमा, थायरॉईड, जुनाट सर्दी, पचनविकार, अर्धशिशी, कमजोरी व शारीरिक दुर्बलता आदी समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच आवश्यकतेनुसार नाडीपरीक्षण, शुगर, ब्लडप्रेशर व बी.एम.आय. तपासणी करण्यात येणार असून, तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन व उपचाराची माहिती दिली जाणार आहे.

कै. यशोदा शेवाळे यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, महाराष्ट्र संघटक, नितीन मोरे, जिल्हा सचिव तसेच सतीश शेवाळे अध्यक्ष जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ यांनी केले आहे.

Scroll to Top