ताज्या बातम्या

कुडाळ पंचशील नगरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार..

कुडाळ(अजित जगताप) : सबका साथ.. सबका विकास.. हे केंद्र सरकार दिल्लीचे धोरण असले तरी गल्लीत त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी स्वयंप्रकाशित व्हा. या विचाराने जावळी तालुक्यातील कुडाळ येथील पंचशील नगर मधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभागातून एक बोअरवेल खोदाई करण्यात आली . त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने खऱ्या अर्थाने येथील लोकांना एकजुटीचे महत्व कळले आहे. जावळी तालुक्यातील मेढा नगरीनंतर महत्त्वाचे केंद्र म्हणून कुडाळ नगरीकडे मोठ्या आशाळभूतपणाने पाहिले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांचा वावर असतो. याच कुडाळ नगरीमध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत पंचशील नगर मध्ये शासकीय निधीचा वापर व्हावा. म्हणून काही वर्षापासून कुडाळ येथील दोनशे लोक वस्ती असलेल्या पंचशील नगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले व या निवेदनाच्या आधारे कुडाळ ग्रामपंचायत मार्फत दोन वेळा आराखडा तयार केला. परंतु, आराखड्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत प्रयत्नांती तळ गाठला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तहान भागवावी लागली होती. काही वेळेला अपुरा पाणीपुरवठा होत होता. शेजारी सार्वजनिक आड असून सुद्धा काही रहिवाशांना या आडाचा पाण्यासाठी वापर करता येत नव्हता. या ठिकाणी स्थानिक पंचशील नगरचे ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त प्रयत्नाने या जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या आडाची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर लोक वर्गणीतून जमा केलेल्या पैशाच्या माध्यमातून त्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर काकडे यांच्या बोअर वेल यंत्रसामग्रीतून समाज मंदिरा शेजारी बोअरवेल यशस्वीरित्या खुदाई झाली आहे. या बोअरवेलला तातडीने पाणी लागल्यामुळे उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली. कुडाळ पंचशील नगर मधील घरटी एक हजार रुपये व दानशूर लोकांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातूनच पंचशील नगर मध्ये स्वयंप्रकाशित व्हा… हा संदेश प्रत्यक्ष अमलात आणला आहे. यासाठी ग्रामस्थांची सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल येथील कुडाळ नगरीच्या रहिवाशांचे जावळी तालुक्यात कौतुक होत आहे. कुडाळ गावामध्ये सर्वधर्मसमभाव चांगल्या पद्धतीने मानला जातो. सर्वांना नागरी सुविधा मिळाव्यात. यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु उंचवट्यावर असल्यामुळे कुडाळ येथील पंचशील नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर बौद्ध समाजातील पंचशील नगर मधील लोकवर्गणीतूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घ्यावी लागली. पहिल्या टप्प्यात यश मिळाली आहे. भविष्यात कुडाळमध्ये लोक वर्गणीतूनच विकास कामे करण्यास सुरुवात केली. आपले प्रश्न सोडवण्यासाठी कुडाळ पंचशील नगरी मधील केलेला विशेष प्रयत्न एक मॉडेल ठरेल. कुडाळ नगरीत भविष्यात स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी अभ्यासिका व तंदुरुस्त करणारी व्यायामशाळा तसेच नागरी सुविधांबाबतही नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विधायक उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, मंगेश गायकवाड, मिलिंद कांबळे , सचिन कांबळे व स्थानिक रहिवाशी या ऐतिहासिक क्षणी आवर्जून उपस्थित होते. या बोअरवेल मारण्याच्या उपक्रमाला सर्व पंचशील नगरीचे रहिवाशी यांच्या प्रयत्नानेच हे यश मिळाले आहे . हा एकजुटीचा विजय आहे. आम्ही फक्त शुभेच्छुक आहोत असे फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अमोल गंगावणे यांनी सांगितले.

Scroll to Top