मेढा

(अजित जगताप).: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप- नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.प.)- आठ व शिवसेना (शिंदे)- चार असे संचालक बिनविरोध व निवडणुकीत विजयी झाले आहेत. यामध्ये संख्याशास्त्रानुसार पराभव माहित असून सुद्धा जावळी तालुक्यात शौर्याने मराठे वीर दौडले आठ असे समीकरण पाहण्यास मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील ४८ विकास सेवा सोसायटीच्या ठराव झालेल्या मतदार सभासदांना आपल्या बाजूने मतदान करावे. यासाठी गेली महिनाभर भारत भ्रमंती करण्यास भाग पाडले. काही जण उत्तर प्रदेश, गोवा, अलिबाग अशी मौजमजा करत होते. यामध्ये शेतकऱ्यांचे भले कमी… पण, इमाने इतबारे मालकाची मर्जी राखण्याचा प्रयत्न झाला. अन्नदाता विजयी भव.. अशी आरोळी देण्यात आली. तर दुसऱ्या बाजूलाही पैसा कमी प्रमाणात असूनही काही सभासदांनी माय भूमी सोडली नाही. दोन्ही बाजूने हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. वास्तविक पाहता तालुक्याच्या विकासासाठी तात्कालीन आमदार शशिकांत शिंदे व सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या राज्य पातळीवर काम करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी खऱ्या अर्थाने जावळी तालुक्यामध्ये विकास कामाचे जाळे विणले आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर बरेच वर्ष प्रलंबित असलेला वेण्णा नदीवर मेढा- मोहाट पुलाची माथाडी नेते व जावळीचे लोकप्रतिनिधी शशिकांत शिंदे यांनी उभारणी करून दळणवळणाची साधने उपलब्ध केली. आदरणीय भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी तर थेट महाबळेश्वर ते विटा सुसज्ज रस्ता निर्मितीसाठी खूप मोठे योगदान दिले. अनेक गावांमध्ये विकास कामे करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. या दोन्ही नेत्यांच्या सोबत राहून आदरणीय वसंतराव मानकुमरे, आदरणीय विद्यमान जिल्हा बँक संचालक ज्ञानेश्वर रांजणे, शिवसेनेचे आदरणीय एकनाथ ओंबळे यांनी सुद्धा चांगले योगदान दिले आहे.
परंतु, जावळी तालुक्यामध्ये सत्तानिष्ठ अनेक कार्यकर्त्यांमुळे राजकीय समीकरण बदलल्यानंतर कार्यकर्त्याची निष्ठाही बदलते. जे कार्यकर्ते काँग्रेसचे जी . जी अण्णा कदम सोबत होते. के नंतर शिवसेनेच्या सदाशिव सपकाळांसोबत आले. राष्ट्रवादीच्या उदयानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे गेले. आता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या छत्रछायेखाली अनेक कार्यकर्ते आहेत. भविष्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर हाच ताफा नवा राजा… नवा कायद्याप्रमाणे बदलणार आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. यामध्ये खऱ्या अर्थाने जावली तालुक्यात काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ज्यांनी आपल्या विचारधारेप्रमाणे पक्षासोबत राहण्यामध्ये स्वतःला धन्य मानले आहे. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतकी असली तरी राजकारणात त्यांची नोंद घ्यावी लागते. चा आदर्श घ्यावा लागतो. हे कधीही नाकारून चालणार नाही. सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान संचालक ज्ञानेश्वर रांजणे विरुद्ध आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अशी लढत होणार होती. परंतु शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक विठ्ठल गोळे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे श्री रांजणे व श्री गोळे यांच्यामध्ये लढत झाली. एका बाजूला मोठ्या संख्येने ठराव, कार्यकर्त्यांची व समर्थकांची फौज, सहली साठी गेलेल्या सभासदांच्या सेवेसाठी गेलेले सेवेकरी कम ठेकेदार यांची झेड सुरक्षा होती. तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानाने मतदान करणे अपेक्षित असताना शोले चित्रपटासारखे तुम्ही एक मारेंगे… तो हम चार मारेंगे.. अशी जिद्द लागली होती. अखिल वेडात मराठे वीर दौडले आठ.. आठ जणांनी मतदान केले. तर त्यांच्या विरोधात ३८ जणांनी मतदान करून श्री ज्ञानेश्वर रांजणे यांना विजयी केले आहे. पराभव दिसत असून सुद्धा श्री गोळे यांनी निवडणूक पार पाडली. त्यांना मिळालेली आठ सभासदांची मते भविष्यात राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरणार आहे.
—————————–
फोटो- सातारा जिल्हा बँक संचालक निवडूनचे फोटो ( छाया- अजित जगताप, सातारा)




