ताज्या बातम्या

नाझरे गावात साकारला ‘हिंदवी स्वराज्या’चा प्रेरणादायी देखावा

भोर : गौरी–गणपती उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, संस्कार आणि इतिहासाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने नाझरे गावातील पोळ परिवाराकडून दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण देखावे साकारले जातात. यंदाही डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासावर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या मावळखोऱ्यातील रायरेश्वर परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा संकल्प केल्याची ऐतिहासिक परंपरा महाराष्ट्राच्या जनमानसात आजही प्रेरणादायी आहे. याच इतिहासाची आणि स्वराज्यनिर्मितीच्या विचारांची ओळख करून देणारा हा देखावा गौरी–गणपती उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
गौरी–गणपतीची आकर्षक आरास, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यकार्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन असा सुंदर संगम या देखाव्यात साधण्यात आला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख व्हावी, तसेच स्वराज्यनिर्मितीमागील त्याग, धैर्य, शौर्य, संघटनशक्ती आणि संस्कार यांची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पोळ परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून गौरी–गणपती उत्सवानिमित्त विविध प्रबोधनात्मक देखावे साकारले जात आहेत. या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मनोरंजनासोबतच सामाजिक व ऐतिहासिक विषयांची माहिती मिळत आहे. यंदाच्या देखाव्यालाही ग्रामस्थ, भाविक आणि गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज मोठ्या संख्येने भाविक गौरी–गणपतीचे दर्शन घेऊन हा प्रेरणादायी देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत.
यावेळी डॉ. गोरखनाथ पोळ, सौ. सविता गोरखनाथ पोळ तसेच S Napkin Bouquet’s Satkar Houseच्या डायरेक्टर मानसी गोरखनाथ पोळ यांनी सर्व ग्रामस्थ, भाविक आणि गणेशभक्तांना गौरी–गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

Scroll to Top