कराड : कराड शहरासह तालुक्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी गॅस वितरण वाहनांवर आवश्यक सुरक्षा व माहितीविषयक सुविधा बंधनकारक कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसीलदार कार्यालय, कराड यांना निवेदन देण्यात आले.
ज्वलनशील गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वितरण वाहनात ISI मानांकित अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच वाहनचालकांना अग्निशमन यंत्राचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सिलिंडरचे वजन तपासण्याची सुविधा द्यावी
ग्राहकांना मिळणाऱ्या सिलिंडरचे अचूक वजन तपासता यावे यासाठी प्रत्येक गॅस वितरण वाहनावर इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे सिलिंडर कमी वजनाचा असल्याच्या तक्रारींची पडताळणी करणे शक्य होऊन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
गावात गॅस वाहन आल्याची ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना
ग्रामीण भागात गॅस वितरण वाहन गावात आल्यानंतर अनेक ग्राहकांना त्याची माहिती वेळेत मिळत नसल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक वितरण वाहनावर स्पीकर अथवा ध्वनिक्षेपक बसवून गावात गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याची सूचना मराठीतून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोठ्या गावांमध्ये एकाच ठिकाणी वाहन उभे न करता दोन ते तीन ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाद्वारे वितरणाची माहिती देण्यात यावी. यामुळे महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय कमी होऊन ग्राहकांना वेळेत सिलिंडर घेता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गोदामांतील अग्निसुरक्षेची माहिती जाहीर करण्याची मागणी
गॅस सिलिंडर गोदामात अथवा अन्य ठिकाणी उतरविल्यानंतर तेथे आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना व उपकरणांची पूर्तता आहे की नाही, याची संबंधित विभागाने तपासणी करून माहिती सार्वजनिक करावी. सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
HP, Bharat आणि Indane गॅस एजन्सींना वितरण वाहनांवर अग्निशमन यंत्र, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व ध्वनिक्षेपक उपलब्ध करून देण्याबाबत तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना देण्याबाबत योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.
या निवेदनावर शरद जगन्नाथ गाडे, अनिल काशीनाथ मोरे, प्रताप आबासो भणगे, संतोष कदम, तन्मय पाटील, विजया माने आणि राहुल वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
“गॅस सिलिंडर वितरणातील सुरक्षितता, अचूक वजन आणि ग्राहकांना वेळेत माहिती मिळणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करावी,” अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.




