सातारा(विजय जाधव) ‘: विकासाच्या नावाखाली सह्याद्रीची वनसंपदा, जैवविविधता आणि वन्यजीवांचे अधिवास उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. सातारा, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतील पर्यावरणाला बाधा पोहोचविणारे पंप स्टोरेज प्रकल्प तातडीने रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हुंबर्ली-बिरमणी येथील १५०० मेगावॅट आणि महाबळेश्वर परिसरातील २४०० मेगावॅट क्षमतेच्या सावित्री पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे जंगलतोड, डोंगरांचे उत्खनन आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती मोरे यांनी व्यक्त केली. विशेषतः महाबळेश्वर-पाचगणीचा पर्यावरण संवेदनशील परिसर आणि भूकंपप्रवण क्षेत्र लक्षात घेता या प्रकल्पांचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे!
सह्याद्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला असताना मंत्री मकरंद पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पांबाबत आपली भूमिका जाहीर करावी. जनतेच्या बाजूने आहात की प्रकल्पांच्या, हे स्पष्ट करा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. प्रकल्प रद्द न झाल्यास सह्याद्रीच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.




