सातारा(अजित जगताप) : सहकार क्षेत्रामध्ये प्रस्थापित घराण्यातील व्यक्तींसाठी राजकारण सोपं हवे. या दृष्टीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे प्रस्थापित मंडळी व त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. परंतु, यंदाच्या वर्षी सातारा जिल्ह्यात विषम पर्जन्यमानामुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काही शेतकरी- सभासद हे सध्या सहलीमध्ये गुंतले आहेत. त्यांना परतीच्या मार्ग सुकर व्हावा. या दोन प्रमुख कारणांमुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक बहुधा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बी- बियाणे व मशागत करून पेरणी केली आहे. पिक सुद्धा जोमामध्ये आली होती. पण, आता पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपून जात आहे. शेतकरी चिंताग्रस्त असताना निवडणुकीच्या माध्यमातून गुलालाची उधळण करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमधील संघर्ष हा टोकाला गेला आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूकच पुढे ढकलावी. असं अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. अनेक संचालकांना सुद्धा जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात काही माहिती नसल्याचा स्पष्ट पणाने खुलासा केला आहे. जिल्हा बँकेच्या संचालकच अन्नभिज्ञ असल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची ही चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला, तरी पूर्व साताऱ्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. माण व खटाव तालुक्यात पाऊस झालेला नाही. या कायम दुष्काळी पट्ट्यात परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सुमारे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट नोंदवली गेली आहे . माण तालुक्यात तर सरासरीच्या केवळ ५९.७ टक्के पाऊस झाला आहे. फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांच्या पूर्व भागातही सप्टेंबर मध्येच हाता तोंडाला आलेली पिक पिवळी पडू लागली आहेत. लागली आहेत. पावसाअभावी विहिरी, हातपंप, पाझर तलाव व बंधारे यांचे पावसाळ्यातील जलसाठे तळाशी गेले आहेत. केवळ माण आणि खटाव तालुक्यातील ४१ गावे आणि २८१ वाड्या-वस्त्यांवर पाणी टँकर्स सुरू करावे लागले आहेत. पिकांच्या वाढीसाठी पोषक असलेला पाऊसच कोसळलेला नाही. खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे . शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. मुक्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पुरवठा विभागाने संभाव्य तीव्र टंचाई लक्षात घेऊन टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व बाधित गाव आणि वाड्यांचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला काम करावे लागणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सप्टेंबर २०२६ मध्ये बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. एकूण २ हजार १९ मतदार (संस्था) जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालकांची निवड करणार आहेत. सर्वाधिक ९६३ मतदार हे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (सोसायटी) मतदारसंघातील आहेत. उर्वरित मतदारांमध्ये नागरी बँका, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ, दूध उत्पादक संस्था, आणि गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे.औद्योगिक विणकर व मजूर संस्था मतदारसंघात नवीन १२ ठराव वाढले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी आणि पॅनेल संदर्भात बैठक झाली . त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. भाजप नेत्यांनी ही बँक ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. पण सभासदांची नाराजी याची जाणीव सुद्धा झाली आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्न बाबत जिल्हा बँकेने कर्जपुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ते काम ठप्प झाले तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शक्यतो पुढे ढकलावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. दरम्यान, सहकार विभागाने सुद्धा याकडे गांभीर्याने निर्णय घ्यावा. जिल्हा बँक निवडणूक म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नसून शेतकरी जगला तर बँक शाबूत राहील. याचाही काहींनी जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. या सर्व घडामोडींमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जाणे संयुक्तिक वाटत आहे…….




