ताज्या बातम्या

रविकांत बेलोशे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान

पाचगणी, ता. ४ : पत्रकारिता, सहकार आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व निष्ठावान कार्य करणाऱ्या पाचगणीतील दैनिक सकाळचे प्रतिनिधी रविकांत दिनकर बेलोशे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे आयोजित ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा २०२६’ या विशेष आणि दिमाखदार कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्र भूषण न्यूज, ग्रेट पीपल फाउंडेशन, विजेता मीडिया आणि फॉर्च्यून मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला उजाळा देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
पुणे येथील वी. का. राजवाडे सभागृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात एम.आय.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. महेश थोरवे सर, स्वराज कॉलेज ग्रुप पुण्याचे चेअरमन गोपाल खंडोर सर, युनायटेड सिटीझन्स राइट्स अँड वेलफेअर कौन्सिलच्या राष्ट्रीय अध्यक्षा भारतीताई रमेश तुपे, ग्रेट पीपल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियांका अमोल आबनावे, वेल्थ कोच व लेखक मा. वल्लभ दौलत बोथरे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्रभाऊ पवार, माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका ॲड. रेश्माताई सूर्यकांत टेळे, अजेय डायग्नोस्टिक प्रा. लि. चे डायरेक्टर डॉ. बरोदे एम.बी. आणि उत्कृष्ट निवेदक व कवी संदीप बापू रासकर सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते रविकांत बेलोशे यांच्या सामाजिक व पत्रकारकीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
रविकांत बेलोशे यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात नेहमीच जनसामान्य, शेतकरी, वंचितांचे प्रश्न आणि स्थानिक समस्यांना प्राधान्य देत वृत्तलेखनाच्या माध्यमातून प्रभावी वाचा फोडली आहे. केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता त्यांनी सहकार क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, दापवडी येथील सहकार चळवळीत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी घेतलेला सहभाग नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे, या भूमिकेतून त्यांनी सातत्याने केलेला प्रवास आणि लोकाभिमुख कार्यामुळेच त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे त्यांच्या पत्रकारकीय व सामाजिक कार्याचा बहुमान झाला असून, महाबळेश्वर, वाई, जावळी आणि पाचगणी परिसरातील पत्रकार बांधवांसह, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराने त्यांची भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या पुरस्कारांमुळे त्यांच्या आगामी सामाजिक व पत्रकारकीय वाटचालीस आणखी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Scroll to Top