घाटकोपर (शांताराम गुडेकर ) : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा संघटक घाटकोपर पश्चिम श्री. यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या घरी विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पाच्या उत्सवाचे यंदा ४६वे वर्ष आहे.
गेल्या ४६ वर्षांपासून खोपकर कुटुंबीयांकडून भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने गणरायाची स्थापना व पूजा-अर्चा केली जाते. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरामध्ये आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते.यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘श्री गणराज्य दरबार’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सोनेरी रंगातील सुंदर मखर, आकर्षक पडदे, फुलांची सजावट, दीपमाळ तसेच पारंपरिक मंदिराच्या स्वरूपातील देखावा यामुळे गणरायाचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. सजावटीमध्ये पारंपरिक संस्कृती आणि भक्तीभाव यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे.गणरायाच्या सभोवतालची आकर्षक आरास आणि रोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून सजावटीचे कौतुक केले जात आहे.
या गणेशोत्सवाच्या माध्यमातून कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक एकत्र येऊन गणरायाचे दर्शन घेतात आणि सुख-समृद्धी, आरोग्य व सर्वांच्या कल्याणासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतात.”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.




