
ठाणे : किसन नगर-पडवळनगर परिसरातील मानाचा गणपती ‘ठाण्याचा महाराजा’ यांच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ठाणे शहरात स्वच्छता व जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. संगम प्रतिष्ठान, कोका-कोला वेबरेजेस, एनएसएस विद्यार्थी आणि ठाण्याच्या महाराजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
संगम प्रतिष्ठानने पुढाकार घेत शिवसेनेच्या ‘आनंदयात्री पर्यावरण सेने’च्या साथीने आणि स्थानिक आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभेच्छांसह शेकडो स्वयंसेवकांच्या सहभागातून स्वच्छता मार्च आणि पेट बॉटल कलेक्शन ड्राईव्ह आयोजित केला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, प्लास्टिक व पेट बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ठाणेकरांनीही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आनंदयात्री पर्यावरण सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी घाग यांनी सांगितले की, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातून सुरू झालेली ही पर्यावरण चळवळ आगामी सहा महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी प्रयत्न केले जातील. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहरांसाठी पर्यावरण सेना सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या उपक्रमात एन.के.टी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. चव्हाण, प्राचार्य किरण पस्टे तसेच आनंदयात्री पर्यावरण विभागाचे कार्याध्यक्ष प्राचार्य धनंजय पस्टे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पर्यावरणीय चळवळीत सहभागी मान्यवरांचे संगम प्रतिष्ठानच्या सचिव अॅड. कोमल तानाजी घाग आणि संचालक रवींद्रलाल नाडर यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. पर्यावरण संवर्धनाच्या पुढील कार्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
वेळेअभावी कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेले स्थानिक नगरसेवक योगेश जानकर तसेच संस्थेचे शुभचिंतक व शिवसेना उपाध्यक्ष मनोजदादा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी संगम प्रतिष्ठान आणि आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या कार्यामागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




