नवी मुंबई, : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ मध्ये बँक ऑफ इंडियाने तृतीय पुरस्कार पटकावला. ८०० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्थांच्या श्रेणीत हिंदीच्या प्रभावी वापरासाठी आणि राजभाषा धोरणाच्या अंमलबजावणीतील उल्लेखनीय प्रगतीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी आयोजित ६व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलन व हिंदी दिवस समारोह २०२६ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक राजीव मिश्रा, मुख्य महाव्यवस्थापक अभिजित बोस आणि राजभाषा विभागाच्या प्रमुख मौ मैत्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
बँक ऑफ इंडियातर्फे राजभाषा हिंदीच्या प्रभावी वापरासाठी, प्रचार-प्रसारासाठी तसेच बँकिंग कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये हिंदी भाषेबाबत जागरूकता व रुची निर्माण करण्यासाठीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत मिळालेला हा पुरस्कार बँकेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.
या यशाबद्दल राजीव मिश्रा, अभिजित बोस, अमित सिंह, महाव्यवस्थापक तसेच राजभाषा विभागाच्या पथकाने आनंद व्यक्त केला. ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्न, बांधिलकी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे बँकेच्या अधिकृत कामकाजात हिंदीचा वापर वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजभाषा विभागाने या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाचे आभार मानत, राजभाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि हिंदीच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी भविष्यातही अधिक जोमाने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.




