सातारा : सातार्यात स्वतंत्र व भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आपण आवश्यक तो पाठपुरावा करून पुढाकार घेऊ, असे आश्वासन खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी होते.
सातारा शहर व जिल्ह्यातील क्रिकेटपटू तसेच क्रिकेटप्रेमींकडून स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सभेत स्टेडियम उभारणीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले की, क्रिकेट स्टेडियमसाठी गोडोली येथे नगरपालिकेच्या मालकीची जागा उपलब्ध आहे. याशिवाय भव्य स्टेडियम उभारण्यासाठी अन्य योग्य जागा उपलब्ध असल्यास ती सुचवावी. स्टेडियम उभारणीसाठी आपण निश्चितच पुढाकार घेऊ.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सचिव सुरेश महाजनी यांनी सोलापूर, कोल्हापूर आणि कराड येथे क्रिकेट स्टेडियमची उभारणी सुरू आहे. त्याच धर्तीवर सातार्यातही अद्ययावत क्रिकेट स्टेडियम व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले व सहकार मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली.
या सभेत खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, सहकार मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह ३४ जणांना असोसिएशनचे सदस्यत्व देण्यात आले. सचिव इर्शाद बागवान यांनी स्वागत करून गतवर्षाचा अहवाल सादर केला.
गतवर्षात विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या संभाव्य रणजी क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सिद्धांत दोशी यांचा सन्मान करण्यात आला. पुरुष खुल्या गटातील उत्कृष्ट फलंदाज जयेश पोळ व गोलंदाज अथर्व पवार, महिला खुल्या गटातील फलंदाज समृद्धी बनवणे व गोलंदाज भूमी फाळके यांनाही गौरविण्यात आले.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटातील फलंदाज निशीगंधा नलावडे व गोलंदाज प्रिया सावंत, १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील फलंदाज तनिष्का मोरे व गोलंदाज आर्या फडतरे, १६ वर्षांखालील मुलांच्या गटातील फलंदाज प्रथमेश दंडवते व गोलंदाज साईश बारटक्के, तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटातील फलंदाज आदिनाथ पाटील व गोलंदाज इशांत जोशी यांचा सत्कार करण्यात आला. इशांत जोशी याची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटातील फलंदाज अवनीश गायकवाड व गोलंदाज कौशल पराडकर यांचाही गौरव करण्यात आला. महाराष्ट्र संघाकडून खेळल्याबद्दल साहिल अवताडे यांचा, तर एमसीए पॅनल पंच सदानंद प्रधान यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला क्रिकेट पंच अंकिता आढाव यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी ॲड. कमलेश पिसाळ, सुरेश साधले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, रमेश शानभाग, सुधाकर शानभाग, भालचंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. खजिनदार राजू जाधव यांनी आभार मानले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
छायाचित्र ओळ : सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सभेत बोलताना ॲड. कमलेश पिसाळ. व्यासपीठावर खा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, सुधीर एकांडे, अमोल मोहिते, निशांत गवळी व रमेश शानभाग.




