मुंबई : राज्यातील शाळांमध्ये घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ (PAT) परीक्षा आता डिसेंबर महिन्यात होणार आहे. भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या परीक्षा यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, शिक्षक भारती संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. आता या परीक्षा २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहेत.
दिवाळीच्या सुट्टीनंतर २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार असून, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान परीक्षा होण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर लगेच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. तसेच सुट्टीनंतर काही विद्यार्थी उशिरा शाळेत दाखल झाल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता होती.
या सर्व बाबींचा विचार करून PAT परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. संघटनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता परीक्षांचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.




