ताज्या बातम्या

कोळेवाडी–तुळसण रस्त्यावर साईडपट्टीची खुदाई; अपघाताचा धोका वाढला!

कराड : तुळसण रस्त्यादरम्यान शिंदेवाडी हद्दीत एअरटेल कंपनीकडून केबल टाकण्याच्या कामासाठी रस्त्याच्या साईडपट्टीची मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे. खुदाई केलेली माती व दगड रस्त्यावरच टाकण्यात आल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला मोठी चर खोदलेली असून, माती-दगडांचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे. तसेच केबलही उघड्यावर असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात या चरमध्ये पाणी साचल्यास रस्ता आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.
एअरटेल कंपनीने कामासाठी संबंधित रस्ता विभागाची परवानगी घेतली आहे का? तसेच काम पूर्ण झाल्यानंतर साईडपट्टी पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित प्रशासन व रस्ता विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून खुदाईची परवानगी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि रस्ता पूर्ववत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.

Scroll to Top