नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित चार दिवसीय ‘हिरकणी महोत्सवा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सेक्टर २६, करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानावर १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार यांच्या पुढाकारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन वर्षातून किमान तीन वेळा, विविध भागांत सात दिवसांसाठी करावे, अशी सूचना केली.
महोत्सवात सुरुवातीला १५० स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या २७५ पर्यंत वाढविण्यात आली. साड्या, कपडे, दागिने, दिवाळी साहित्य, हस्तकला वस्तू आणि फराळाचे पदार्थ अशा विविध वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांचे २१ स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत.
महापौर सुजाता पाटील यांनी महिलांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ऐच्छिक निधी देण्याचे आवाहन केले. ईटीसी दिव्यांग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी आणि पालकांनी तयार केलेल्या वस्तूंनाही महोत्सवात स्थान देण्यात आले आहे.
महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ आणि त्यांच्या उत्पादनांना ग्राहक मिळवून देणारा हा महोत्सव महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.




