मलकापूर : रोटरी क्लब मलकापूरच्या वतीने हौसाई विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, आहार आणि शारीरिक बदल याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘कळी उमलताना’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. डॉ. सौ. सुषमा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या शिबिरात हौसाई विद्यालय तसेच शामराव पाटील विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमोल मोटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि सकस व पूरक आहार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी फास्ट फूडपासून दूर राहून घरगुती व पौष्टिक पदार्थांचा आहारात अधिकाधिक समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. सौ. सुषमा मोटे यांनी किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक बदलांदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार-विहार कसा असावा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयींचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब मलकापूरचे अध्यक्ष राजन वेळापुरे, सचिव संजय बडदरे, सदस्य भगवान मुळीक, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, प्राचार्य सतीश सावळकर, पद्मावती मुळीक, वैशाली पवार, शुभांगी पाटील, अंजली जानुगडे, ऋषिकेश पोटे, प्रकाश बाबर, चव्हाण सर, मोहसीन नायकवडी, सुधाकर कांबळे, विकास शिंगाडे, अशोक साठे, महेंद्र अंबवडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




