मुंबई : AISEEC Foundationच्या सहाव्या आणि ‘साहित्य जागर’च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील अंध व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्तरीत्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत मनू सुबेदार सभागृह, एम. एन. बी. इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड, स्वामी विवेकानंद रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात राज्यातील अंध व्यक्तींसाठी समूहगीत गायन स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा अशा दोन अभिनव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समूहगीत गायन स्पर्धेत भाषा-विषयाचे कोणतेही बंधन नसून सामूहिक गायन व वादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर काव्यवाचन स्पर्धेत हयात नसलेल्या, मात्र आपल्या कवितांमधून अजरामर झालेल्या अंध कवी-कवयित्रींच्या कवितांचे वाचन करण्यात येणार आहे.
अंध रसिक श्रोत्यांना दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी स्पर्धांसोबत विशेष साहित्यिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिवाचक यशश्री-नितीन यांचे कथा-अभिवाचन होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत नावनोंदणी व चहा-नाश्त्याने होईल. सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ, ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत समूहगीत गायन स्पर्धा, १ ते २ भोजन सुट्टी, दुपारी २ ते ४ काव्यवाचन स्पर्धा, ४ ते ५ कथा-अभिवाचन आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. सहभागींसाठी दिवसभर अल्पोपहार, भोजन तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंध व्यक्तींच्या कलागुणांचा आस्वाद घेण्यासोबतच त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन व सन्मान देण्यासाठी निमंत्रित पाहुण्यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन AISEEC Foundationचे अध्यक्ष संजय होनमाने आणि ‘साहित्य जागर’चे संस्थापक संपादक हर्षद जाधव यांनी केले आहे.



