ताज्या बातम्या

कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी; एस.एस. मोबाईल शॉपी चोरी प्रकरणी दोघांना कर्नाटकातून अटक

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : कराड शहरातील एस एस मोबाईल शॉपीचे शटर तोडून सुमारे ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल संच चोरून नेणाऱ्या टोळीतील दोघांना कराड शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कर्नाटकातील वस्कोटी, जि. बंगळूर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.

दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दोनच्या सुमारास एस एस मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील नवीन मोबाईल संच लंपास केले होते.

घटनेनंतर पोलिसांनी दुकान व परिसरातील सीसीटीव्ही

फुटेज तपासले असता आरोपींनी स्विफ्ट कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. ही कार शामगावघाट मार्गे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. कराड शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या

पथकांनी समन्वयाने तपास करत संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान आरोर्पीचे वास्तव्य हरियाणा व राजस्थान परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अशोक लेलँड ट्रकच्या माध्यमातून चोरीचा माल हरियाणा व राजस्थान येथे पाठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने दि. ३० ऑगस्ट रोजी कर्नाटक गाठले. दि. ३१ ऑगस्ट रोजी वस्कोटी, जि. बंगळूर येथून अब्दुलहाय वशीरअहमद (वय ५१, रा. बावला, ता. नूंह, जि. नूंह मेवात, हरियाणा) आणि

अलाऊद्दीन जहरुद्दीन (वय ३१, रा. न्हेलहांडा, ता. जेवर, जि. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीतील मोबाईल संच व अन्य मुद्देमालाबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या गुन्ह्यामागील संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.

पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच डी. बी. पथकाने ही कारवाई केली.

Scroll to Top