ताज्या बातम्या

तमिळनाडूत संगम प्रतिष्ठानसोबत आनंदयात्री पर्यावरण सेनेची पर्यावरण जनजागृती मोहीम

तमिळनाडू, दि. ३ सप्टेंबर : तमिळनाडू राज्य सरकार आणि वेलांकनी पंचायत समितीच्या पुढाकाराने वेलांकनी चर्च ग्राम परिसरात स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच ‘पेट कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यासाठी मुंबईतील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संगम प्रतिष्ठान संस्थेला विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार सुमारे १५ दिवस परिसरात स्वच्छता जनजागृती, प्लास्टिक व ‘पेट’ कचरा संकलन तसेच ‘थ्री आर’ (Reduce, Reuse, Recycle) संकल्पनेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचे काम सुरू आहे.
या उपक्रमात संगम प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. कोमल तानाजी घाग, संचालक तथा आनंदयात्री पर्यावरण सेनेचे पदाधिकारी रंगनाथ नाडर यांच्यासह संपूर्ण टीम सक्रियपणे सहभागी झाली आहे. स्थानिक पंचायत, जिल्हाधिकारी प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागामुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी भविष्यातही अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी संगम प्रतिष्ठानच्या टीमची मदत घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल कोका-कोला वेबरेजेस, वेलांकनी पंचायत आणि तमिळनाडू राज्य सरकारने महाराष्ट्रातील संगम प्रतिष्ठान व आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या टीमचे आभार मानले आहेत.

Scroll to Top