तळमावले/वार्ताहर : ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस एका वेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत, चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा 12 वा वाढदिवस बुधवार, 21 ऑक्टोबर, 2026 रोजी अत्यंत साधेपणाने, परंतु समाजाप्रति उत्तरदायित्व जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने साजरा केला जात असून, या निमित्ताने सैदापूर येथील घंटागाडी चालकांना ‘स्वच्छता योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आणि डाकवे परिवाराचे आर्थिक योगदान यांतून सैदापूर ग्रामपंचायतीचे घंटागाडी चालक दीपक प्रकाश रास्ते, मार्तंड अरुण रास्ते, अमीर सलीम मुल्ला, बाळू हंबीरराव पाटसुपे व यासीन कादर तांबोळी यांना स्वच्छता योद्धा प्रमाणपत्र, स्वच्छतादूत पुस्तक आणि आरोग्य व स्वच्छता साहित्य किट देऊन सन्मानित केले जाणार आहे.
यापूर्वीही स्पंदनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डाकवे परिवाराने नाम फाउंडेशनला 35 हजाराचा निधी, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजाराचा निधी, ग्रंथतुलेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेला पुस्तके, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य, शांताई फाउंडेशनला जीवनावश्यक वस्तू, गरजू विद्यार्थ्यांची 6 हजाराची शैक्षणिक फी, श्री बालाजी मतिमंद शाळेस मदत, ऊसतोड कामगारांना दिवाळी किट, इर्शाळवाडी पूरग्रस्तांना मदत तसेच रुग्णास उपचारासाठी 5 हजाराची आर्थिक मदत असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.
सामाजिक जबाबदारीचे भान राखून डॉ.संदीप डाकवे व डाकवे परिवाराने राबवलेले हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, या कार्याला बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकुवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासाहेब निवडुंगे आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
दरम्यान, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर डॉ.संदीप डाकवे यांनी सातत्याने प्रभावी लेखन केले असून, आजअखेर त्यांचे 125 हून अधिक लेख, बातम्या आणि यशोगाथा प्रसिद्ध झाल्या आहेत. यातील निवडक व मार्गदर्शक भागांचे संकलन करून ‘स्वच्छता दूत’ हे पुस्तक ‘स्पंदन-सांची प्रकाशन’तर्फे प्रकाषित केले आहे. त्यांच्या या विस्तृत लेखमालेची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी विशेष पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. केवळ शब्दांतूनच नव्हे, लग्नपत्रिका व गुढीपाडव्याच्या शुभेच्छापत्रांतून स्वच्छतेचा प्रसार, व्यंगचित्रांमधून जनजागृती, कचरावेचक गाडी चालकाचा संविधान प्रत देऊन सन्मान, स्वच्छ सर्वेक्षणावर 75 लेखांच्या पोस्टरचे साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन आणि विविध माध्यमांतून स्वच्छतेचा संदेश देत आपल्या रेखीव कलेतून स्वच्छतेचा प्रसार करण्यात डॉ.डाकवे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.




