ताज्या बातम्या

राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी ‘सक्तीच्या सैन्य प्रशिक्षणा’ची आवश्यकता; माजी खासदार राहुल शेवाळे यांचे प्रतिपादन

मुंबई : “देशाच्या भावी पिढीच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी आणि राष्ट्रउभारणीसाठी किशोरवयापासून सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण आवश्यक आहे”, असे स्पष्ट मत शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रपूजनाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, विविध शस्त्रांसह साहसी खेळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे आणि शास्त्रीय संगीतातील वाद्यांचे देखील पूजन करण्यात आले. राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष सौ.मंजिरी मराठे, विविध खेळांचे प्रशिक्षक, अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी मुले उपस्थित होती.

प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अधोरेखित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून खंडे नवमीच्या दिवशी (दसऱ्याच्या पूर्वसंध्येला) सावरकर स्मारक येथे शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. या कार्यक्रमात बोलताना राहुल शेवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जागवल्या आणि सद्यस्थितीत त्यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली. रणजित सावरकर यांनी देखील शेवाळे यांच्या मताशी सहमती दाखवून स्मारकाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

स्मारकाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांच्या पाठोपाठ सर्वच उपस्थितांनी शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित
राज्यभरातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने याआधीच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असा संकल्प महायुतीने केला असून उद्याच्या दसरा मेळाव्यातही, शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना आणि विशेष उपक्रमांची घोषणा करण्यात येईल, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Scroll to Top