ताज्या बातम्या

घोगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त लालपरीच्या चालक-वाहकांचा सन्मान; श्री रेणुका माता मंदिराच्या वतीने उपक्रम

घोगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीतून प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या चालक आणि वाहकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी श्री रेणुका माता मंदिर, ज्योतिबा नगर, घोगाव यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मलकापूर आगाराच्या मलकापूर–भेडसगाव–परळ बसला मार्गफलक प्रदान करण्यात आला. तसेच या बसच्या चालक-वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मलकापूर–कोकरूड–पुणे–नाशिक आणि नव्याने सुरू झालेल्या मलकापूर–कोकरूड–कराड–म्हसवड बससेवेच्या चालक-वाहकांचाही सत्कार करण्यात आला. महिला वाहकांचा स्थानिक महिलांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
ऊन-पाऊस सहन करत ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्र एसटी प्रेमी समितीचे जावेदभाई मुलाणी, नरेंद्र कांबळे आणि वनिता काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
‘खासगीपेक्षा लालपरी बरी, सुरक्षित प्रवासाची हमी खरी!’ या संदेशातून एसटी सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. लालपरी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असून, चालक-वाहकांचा सन्मान म्हणजे त्यांच्या सेवाभावाचा गौरव असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Scroll to Top