मुंबई : शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देताना गोरेगाव येथे आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थितांचे डोळे पाणावले. जावली आणि महाबळेश्वर तालुक्यांतील १०५ गावांतील समाजबांधवांच्या वतीने रविवार, १८ ऑक्टोबर रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
२०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे कोयना-सोळशी-कांदाटी विभागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे २३०० एकर क्षेत्र बाधित झाले होते. अशा कठीण परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने पुढाकार घेत शेतजमीन सुधारणा करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार मिळाला.
नाना पाटेकर यांचे या विभागाशी रक्ताचे नाते नसले, तरी त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे ते प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य बनले होते. त्यांच्या कार्यामुळे दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना नव्याने उभे राहण्याची उमेद मिळाली. त्यांच्या योगदानाची परतफेड कोणत्याही शब्दांत करता येणार नाही, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. नानांसोबतच्या आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. नाम फाउंडेशनचे पदाधिकारी बाळासाहेब शिंदे, स्वप्निल थोरात आणि गणेश सकपाळ, अभिनेते विजय निकम तसेच नानांचे गोव्यातील सहकारी इमरान शेख उपस्थित होते.
नाना पाटेकर यांनी केलेले सामाजिक कार्य आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला आधार कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




