मुंबई : अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे नुकतेच नाटककार जयवंत दळवी लघू नाट्यगृह, कै प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा या शीर्षकाखाली ‘प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा’ या सोहळ्यात रसिक श्रोते आणि वाचकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन करण्यात आले. ओडिसी नृत्य गुरू श्रीमती शुभदा वराडकर, गिरगांव कट्टा चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदीप मालणकर, बोरीवली आवृत्तीच्या सहसंपादिका सौ. रेवा राजेश देसाई, कला संपादिका माननीय भक्ती सावंत यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले. ११ जून १९६६ रोजी स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी यांनी अंबरनाथ येथून आहुति साप्ताहिक सुरू केले. प्रारंभी पाक्षिक असलेल्या आहुतिचे सहा महिन्यांत साप्ताहिकात परिवर्तन झाले. वसंतराव त्रिवेदी यांनी कल्याण, डोंबिवली वसई विरार पालघर डहाणू मनमाड अशा आवृत्त्या प्रकाशित केल्या. आता गिरीश वसंतराव त्रिवेदी यांच्या संपादकत्वाखाली बोरीवली आवृत्ती प्रकाशित करण्यात येत असून रेवा राजेश देसाई यांनी सहसंपादिका आणि माननीय भक्ती सावंत यांनी कला संपादिका म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. गिरगांव कट्टा चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रदीप मालणकर, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई, मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब, कला महर्षी उदय पै आणि बाळकृष्ण सावंत अशा असंख्य हितचिंतकांनी या आवृत्तीसाठी अनमोल सहकार्य केले आहे.*




