ताज्या बातम्या

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय सुखरूपरित्या मुंबईत दाखल; शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले स्वागत

मुंबई, ता. 3 : नेपाळमधील महापुरामुळे चीन- नेपाळ सीमेवर अडकून पडलेले 54 भारतीय भाविक अखेर सुखरूपरित्या मुंबईत दाखल झाले. गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या या भाविकांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने, सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या भाविकांनी महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचे आभार मानले.

विमानतळावर पोहोचताच या भाविकांच्या नातेवाईकांसह शिवनेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मिठाई भरवून आणि गुलाब पुष्प देऊन, राहुल शेवाळे यांनी या भाविकांसोबत संवाद साधला.

ऑगस्ट महिन्याच्या 22 तारखेला 54 जणांचा ग्रुप नेपाळमध्ये दाखल झाला होता. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले हे भाविक महापुरामुळे चीनच्या सीमेवर अडकून पडले. शिवनेच्या मदत कक्षासोबत काठमांडूमध्ये गेलेल्या राहुल शेवाळे यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी ताबडतोब या भाविकांसोबत संपर्क साधला. त्यानंतर, राहुल शेवाळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे या भाविकांसोबत संपर्क साधला आणि त्यांना धीर देऊन सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला. महाराष्ट्र सरकार, भारतीय दूतावास आणि नेपाळ दूतावासाशी संपर्क करून या 54 जणांना काठमांडू मध्ये आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. काठमांडू येथे सुखरूप पोहोचल्यावर गुरुवारी हे भाविक विमानाने मुंबईत दाखल झाले.

“माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने नेपाळमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. महापुरामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना या कक्षाच्या माध्यमातून सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. 54 भाविकांचा हा ग्रुप मुंबईत येईपर्यंत आम्ही सर्वजण त्यांच्या संपर्कात होतो. हा क्षण म्हणजे शिवसेनेचा समाजकार्याचा वसा अधोरेखित करणारा क्षण आहे”
– राहुल शेवाळे, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार

“वास्तविक, इतक्या प्रलयंकारी महापुरातून आम्ही वाचलो, यासाठी ईश्वराचे आभार मानतो! आणि या कठीण प्रसंगात आमच्याशी संपर्क साधून आम्हाला धीर दिल्याबद्दल आणि परत मुंबईत येण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आम्ही 54 जण त्यांचे सदैव ऋणी राहू”
– संजय सावंत, भाविक

Scroll to Top