ताज्या बातम्या

वाशी–CSMT सकाळच्या लोकलमधील ‘रिटर्न प्रवाशां’च्या गर्दीचा प्रश्न सोडवा; ठाणे–वाशी–CSMT थेट लोकल सुरू करण्याची मागणी

मुंबई : नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, रोजगार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामुळे मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये ‘रिटर्न प्रवाशां’मुळे नवी मुंबईतील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात ‘धगधगती मुंबई’चे संपादक व पत्रकार – महाराष्ट्र शासन श्री. भीमराव बाळकाबाई हिंदुराव धूळप यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. गोवंडी, मानखुर्द आदी स्थानकांवरील काही प्रवासी आधी वाशीच्या दिशेने प्रवास करून पुन्हा वाशीहून CSMTकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करतात. त्यामुळे वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या नियमित प्रवाशांना गाडीत चढणेही अनेकदा कठीण होते.
वाशी–CSMT प्रवासासाठी सुमारे ५० मिनिटांचा कालावधी लागत असल्याने सकाळच्या वेळेत अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविणे, गर्दीचे नियोजन करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच ठाणे–वाशी–CSMT थेट लोकल सेवा सुरू करण्याची शक्यता तपासावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यास ठाणे व नवी मुंबईतील हजारो प्रवाशांना गाडी बदलण्याचा त्रास कमी होऊन मोठा दिलासा मिळू शकतो.
या मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच रेल्वे मंत्रालयानेही गांभीर्याने दखल घेऊन प्रवाशांच्या हितासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top