ताज्या बातम्या

औषधनिर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर; ९,८७४ कोटींची गुंतवणूक, २१ हजारांहून अधिक रोजगार; खा. वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नावर सरकारचे उत्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या औषधनिर्माण क्षेत्रातील उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (PLI) योजनेंतर्गत महाराष्ट्रात ९,८७४.०८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून २१ हजार २५४ रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. या योजनेंतर्गत राज्यातील १४ अर्जदारांना मंजुरी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही माहिती दिली.
गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत औषधनिर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांचा तपशील, आयातित ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स (APIs) वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, महाराष्ट्राला मिळालेला वाटा, तसेच राज्यातील औद्योगिक गुंतवणूक व रोजगारनिर्मितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याशिवाय महाराष्ट्रात ‘फार्मास्युटिकल पार्क’, ‘बल्क ड्रग पार्क’ किंवा ‘वैद्यकीय उपकरण निर्मिती क्लस्टर’ उभारण्याचा सरकारचा विचार आहे का, तसेच अकोला जिल्ह्यातील उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) या योजनांचा लाभ मिळाला आहे का, अशीही विचारणा त्यांनी केली.
उत्तरात मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, देशात महत्त्वपूर्ण की स्टार्टिंग मटेरियल्स (KSMs), ड्रग इंटरमीडिएट्स (DIs) आणि ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स (APIs) यांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने PLI योजना सुरू केली आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत ३३ APIs च्या उत्पादनासाठी ४८ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत ४,३२९.९५ कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणुकीच्या तुलनेत ५,०७०.४५ कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
‘बल्क ड्रग पार्क’ योजनेअंतर्गत भरूच (गुजरात), नक्कापल्ली (आंध्र प्रदेश) आणि उना (हिमाचल प्रदेश) येथे तीन बल्क ड्रग पार्क्सना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील कोणत्याही अर्जदाराला या योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील औषधनिर्माण क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीमुळे राज्याचे या क्षेत्रातील महत्त्व अधिक बळकट झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Scroll to Top