प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ऐरोली सेक्टर 5 येथे उभारण्यात येत असलेले नुतन नाट्यगृह, सेक्टर 10 ए येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारक त्याचप्रमाणे एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेला ऐरोली काटई भुयारी मार्ग आणि सिडकोमार्फत काम सुरू असलेला खारघर तुर्भे भुयारी मार्ग या प्रकल्पांची पाहणी करीत यामुळे नवी मुंबईच्या विकासात लक्षणीय भर पडेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी व्यक्त केला. महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सूचित केल्यानुसार, आज विविध लोकोपयोगी प्रकल्पांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली व या कामांना वेग देऊन तसेच कामाचा दर्जा राखून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे सूचित करण्यात आले.
याप्रसंगी वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्यासमवेत महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड व एमएमआरडीए, सिडको व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.




