मुंबई, दि. ३१ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांना पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब आणि इतर सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
हे प्रकरण जून २०२३ मधील आहे. वांद्रे (पूर्व) येथील ठाकरे गटाचे कथित अनधिकृत जनसंपर्क कार्यालय बृहन्मुंबई महापालिकेने पाडल्यानंतर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एच-पूर्व विभाग कार्यालयात धडक दिली होती. या आंदोलनादरम्यान पालिकेचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्याशी वाद झाला आणि त्यांना मारहाण व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घटनेनंतर वाकोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी नगरसेवक सदानंद परब यांच्यासह काही शिवसैनिकांनाही अटक करण्यात आली होती.
प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आरोप सिद्ध करण्यास अपुरे असल्याचे नमूद केले. त्यामुळे अनिल परब, सदानंद परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालामुळे ठाकरे गटात समाधानाचे वातावरण असून, हा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा कायदेशीर दिलासा मानला जात आहे.




