ताज्या बातम्या

मोबाईल रिचार्ज दरवाढीने सर्वसामान्य हैराण; सरकारने हस्तक्षेप करण्याची नागरिकांची मागणी

मुंबई(भीमराव धुळप) : मोबाईल सेवा पुरविणाऱ्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवण्यासाठीच आता किमान सुमारे ₹299 ते ₹301 खर्च करावा लागत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांकडून केली जात आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात हा अतिरिक्त आर्थिक बोजा नागरिकांवर पडत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ग्राहकांचे म्हणणे आहे की, यापूर्वी ₹99 किंवा ₹199 च्या रिचार्जमध्ये मोबाईल सेवा सुरू ठेवणे शक्य होत होते. मात्र, आता किमान रिचार्जची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्यांना इंटरनेट डेटा कमी प्रमाणात वापरायचा असतो, त्यांनाही केवळ मोबाईल सेवा सुरू ठेवण्यासाठी जास्त रकमेचा रिचार्ज करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याशिवाय, डेटा पॅक आणि नियमित रिचार्ज वेगवेगळे घ्यावे लागत असल्याने खर्चात आणखी वाढ होत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. वेळेवर रिचार्ज न केल्यास येणारे कॉलही बंद होतात, त्यामुळे मोबाईल सेवा कायम ठेवण्यासाठी ग्राहकांना वाढीव रक्कम खर्च करणे अपरिहार्य ठरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाढत्या रिचार्ज दरांमुळे सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगत सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे, दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज धोरणाचा आढावा घ्यावा आणि सर्वसामान्यांना परवडणारे किमान रिचार्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.

Scroll to Top