मुंबई : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी या गावच्या मातीतून घडलेले, कष्टकरी शेतकरी कुटुंबातील आणि पैलवानकीची पार्श्वभूमी असलेले शिवसेनेचे निष्ठावंत नेते प्रशांत काळे यांचे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. १६ जून २०२५ रोजी ब्रेन स्ट्रोक आल्यापासून त्यांच्यावर प्रदीर्घ उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने शिवसेनेची मोठी हानी झाली आहे.
प्रशांत काळे यांचा जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. काँग्रेसमधून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेपर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदे गटात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या संघटनकौशल्याची दखल घेत त्यांच्यावर शिवसेना संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
सांगली आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, मंत्रालयात पाठपुरावा करणे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना आधार देणे हा त्यांचा स्वभाव होता. ते एक कुशल अकाउंटंट होते. गृहसंकुलांचे लेखापरीक्षण तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांमध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी काळे, दोन मुले व मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
सोनाईचीवाडीचा हा कर्तृत्ववान सुपुत्र आणि शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!




